सायंबाची वाडी “पाणीदार’

दुष्काळग्रस्त गावात साचले पाणी


ग्रामस्थांच्या श्रमदानामुळे भूजल पातळी वाढली


वॉटर कप स्पर्धेअंतर्गत झालेल्या कामांचा झाला लाभ

बारामती – कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या बारामती तालुक्‍यातील जिरायती भागातील सायंबाची वाडी या गावाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळावर मात करीत पाणीदार गाव करण्याची किमया साधली आहे. बारामती तालुक्‍यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे सायंबाची वाडी गावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. गावकऱ्यांच्या कठोर परिश्रमामुळे गावातील भूजल पातळी वाढली आहे. गरजेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने गावात आनंदाच वातावरण आहे. बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदा पवार तसेच ऍड. भगवान खारतोडे यांच्या हस्ते गावकऱ्यांनी जलपूजन केले.

लोकसहभागातून गावाची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेऊन पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने लोकसहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून शेतात बांधबंदिस्ती, अनघड, दगडी बांध, समतल चर, वृक्ष लागवड, शोषखड्डे, विहीर पुनर्भरण, नाफेड आदी कामे केली आहेत.

वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून सायंबाची वाडी गावाने लोकसहभाग व श्रमदानातून खूप मोठे काम केले, त्यामुळे पावसाचे पाणी गावात आडवणे शक्‍य झाले. कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या सायंबाची वाडी गावात गरजेपेक्षा जास्त पाणी साठले गेले. पाण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करणाऱ्या गावकऱ्यांना इथून पुढील काळात पाण्याची वानवा भासणार नाही असे असले तरी योग्य नियोजनाद्वारे पाण्याचा वापर होणे गरजेचे आहे.
– सुनंदा पवार, विश्‍वस्त, बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट


दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सायंबाची वाडी या गावाने पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून राज्यात 16 गावे पात्र ठरली, त्यापैकी बारामती तालुक्‍यातील सायंबाची वाडी या गावाची निवड झाली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर गावात कामकाज झाले. त्याचा परिणाम म्हणजे नुकत्याच झालेल्या पावसामुळे हे गाव पाणीदार झाले असल्याने आगामी काळात गावावर पाण्याचे संकट येणार नाही. असे असले तरी पाणी वापराचे नियोजन देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
– ऍड. भगवान खारतोडे, बारामती

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)