सोमेश्वर परिसरातील शेतकऱ्यांचा प्रयोग
सोमेश्वरनगर – परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक घेतले आहे. या पिकाला चांगला बाजारभाव मिळाला असून आता याचा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक न काढता त्याच सरीने दुसरे अंतर्गत पीक घेणे पसंत केले आहे.
सोरटेवाडी (ता. बारामती) येथील शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक हमीभाव कमी व येणार खर्च परवडत नसल्यामुळे निराश न होता त्याच शेतात गावरान काकडी हे पीक घेतले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो 440 व अन्सल या जातीचे पीक घेतले होते. सध्या तरी टोमॅटोला बाजारभाव कमी असल्याने गावरान काकडीची लागवड करून टोमॅटो पिकाच्या सरीचा उपयोग केला आहे. काकडी लागवडीसाठी 20 ते 22 हजार रुपये एकरी खर्च येतो, असे शेतकरी दत्तात्रय कोलते, रमेश गायकवाड हिंदुराव सकुंडे, दिगंबर मगर यांनी सांगितले. निंबुत, वाघळवाडी, वाणेवडी, करंजे, होळ, सोरटेवाडी, सस्तेवाडी, मुरूम, माळशी या भागात शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली होती. बाजाभाव व पीक कालावधी संपत आल्याने खर्च वजा जाता गावरान काकडी या रोप लागवड स्वरूपात पीक घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.