पाणी कपातीने वाढणार टॅंकर

नागरिकांचा विरोध : वाकड, पिंपळे सौदागरमध्ये समस्या गंभीर

पिंपरी  – महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला शहरातील सोसायटीधारकांकडून विरोध सुरू झाला आहे. स्मार्ट सिटी होत असलेल्या शहरात महापालिकेने चोवीस तास पाणी द्यायला हवे, किमान दिवसातून दोन वेळा तरी पाणी द्यावे, हे न करता त्याऐवजी आता आठवड्यातून एक दिवस पाणी कपात सुरू केल्याने उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये टॅंकरची मागणी वाढणार आहे.

वाकड, पिंपळे सौदागर या परिसरातील सोसायट्यांना प्रामुख्याने पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्याचबरोबर समाविष्ट गावांमध्ये नव्याने झालेल्या सोसायट्यांना देखील या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सोसायट्यांना दररोज सरासरी 10 ते 15 टॅंकर पाणी मागवावे लागत आहे. दररोज पाणीपुरवठा सुरू झाल्याने त्यांची टॅंकरची मागणी कमी झाली होती. मात्र, आता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने त्यांची टॅंकरची मागणी वाढून नागरिकांचा खर्चही वाढणार आहे.

नव्या गृहप्रकल्पांना बांधकाम परवानगी आणि पूर्णत्व दाखला देताना काही अटी घातलेल्या आहेत. सोसायट्यांची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पाणीपुरवठा टप्पा-5 आणि 6 चे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत विकसकाने जादा पाणीपुरवठ्यासाठी आवश्‍यक व्यवस्था करणे गरजेचे आहे. मोठ्या सोसायट्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करायला हवा. एक दिवस पाणी बंदचा निर्णय आजपासून सुरू झाला. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी या निर्णयामुळे काय फायदा झाला, याचे चित्र दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होईल.

– मकरंद निकम, सह-शहर अभियंता, महापालिका.

महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने टॅंकरची कमी झालेली मागणी पुन्हा वाढणार आहे. महापालिकने स्मार्ट सिटीमध्ये 24 तास पाणी देणे आवश्‍यक आहे. मात्र, ते शक्‍य नसल्यास किमान दिवसातून दोनदा पाणी द्यायला हवे. तसेच, ज्या भागांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. तेथे जादा पाणी उपलब्ध करून देण्याबाबत महापालिकेने निर्णय घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा, नागरिकांच्या असंतोषामध्ये आणखी वाढ होईल.

– के. सी. गर्ग सरचिटणीस, पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)