भोरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तूर्तास मिटला

भोर – भोर नगरपालिकेच्या नळपाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती, तर दुसरी जलवाहिनी फुटलेली असल्याने भोर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नातून नीरा देवघर धरण प्रकल्पातील कालव्याची साफ सफाई करून येथे 30 अश्‍वशक्‍तीच्या दोन मोटर्स बसवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आज यातील एक मोटर कालव्यावर बसविण्यात आली असून हे पाणी भोर नगरपालिकेच्या पाणीपुरवठाच्या टाकीत सोडण्यात आले. निर्जंतुकीकरण करून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने भोर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तुर्तास मार्गी लागला असल्याचे नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी सांगितले.

यावेळी आमदार संग्राम थोपटे, उपनगराध्यक्ष गणेश पवार, गट नेते सचिन हर्णसकर, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, बांधकाम अभियंता राजेंद्र सोनवणे, पाणीपुरवठा अभियंता किशोरी फणसेकर, प्रमोद कुलकर्णी, तौफिक आतार, निलेश पालकर, चंद्रकांत वालगुडे, गटनेते सचिन हर्णसकर, नगरसेवक सुमंत शेटे, चंद्रकांत मळेकर, अमित सागळे, माजी नगरसेवक जगदिश किरवे आदी उपस्थित होते.

नीरा देवघर धरण जलाशयातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी भोरेश्‍वरनगर येथील कालव्यातून उचलण्यात आले असून निर्जंतुकीकरणानंतरच त्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे ते पिण्याकरीता सुरक्षित असून नागरिकांनी कोणतीही शंका न घेता पाण्याचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा आवारे यांनी केले.

आमदारांमुळे पाच मिनिटांत वीज मीटर…
भोर शहराच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांचे मोठे योगदान असुन यासाठी वीज जोडणी तातडीने मिळणे गरजेचे होते. यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, भोरचे उपविभागीय अभियंता संतोष चव्हाण, भोर शहराचे शाखा अभियंता सचिन राऊत यांच्याकडे पाठपुरावा करीत आमदार थोपटे यांनी अवघ्या पाच तासांत वीज मीटरची व्यवस्था केल्याने पाणी पुरवठ्याचे काम तातडीने मार्गी लागले, असे नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here