पाणी कपातीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा

सत्ताधाऱ्यांनी फोडले प्रशासनावर खापर : टॅंकर लॉबीसाठी कृत्रिम टंचाईचा आरोप
पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांना आजपासून आठवड्यातून एक दिवस पाणी कपात लागू झाली आहे. त्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असताना सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर पाणी टंचाईचे खापर फोडले आहे. टॅंकर लॉबीसाठी कृत्रिम पाणी टंचाई सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. दिवसाआड पाणी कपात योग्य असल्याच्या भूमिकेवर महापौर राहुल जाधव ठाम आहेत. तर प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याचा आरोप भाजप नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केला आहे.

दुसरीकडे नागरिकांमध्येही पाणी कपातीच्या निर्णयावरुन प्रचंड रोष दिसून येत आहे. पिंपळे सौदागर, वाकड अशा उच्चभ्रू परिसरातील मोठ-मोठ्या सोसायट्यांना भर पावसाळ्यातही पाणी विकत घ्यावे लागत होते. सोसायट्यांचे संपूर्ण बजेट अपुऱ्या पाण्यामुळे कोलमडले आहे. मेन्टेनन्सची मोठी रक्‍कम रोज पाण्याचे टॅंकर विकत घेण्यातच खर्च होत आहे. एकीकडे शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण तुडुंब भरलेले असतानाही पुन्हा एकदा नागरिकांवर पाणी कपात लादण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडकरांची दिवसाआड सुरू असलेली पाणी कपात गेल्या आठवड्यातच रद्द करण्यात आली होती. अचानकच खूपच आश्‍चर्यकारक पद्धतीने आठवड्यातून एकदा पाणी कपात करण्याचा निर्णय घेऊन सत्ताधारी आणि प्रशासनाने टॅंकर लॉबीला मोठा दिलासा दिल्याचा आरोप आता नागरिक देखील करु लागले आहेत.

विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापौर जाधव यांना निवेदन देत टॅंकर लॉबीसाठी ही कृत्रिम पाणी टंचाई असल्याचा आरोप केला आहे. शहरवासियांना समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. परंतु, नियोजनशून्य आणि भोंगळ कारभारामुळे ऐन सणासुदीत शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. टॅंकर लॉबीच्या फायद्यासाठी सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या पाणी कपातीच्या निर्णयाला प्रशासनाची साथ आहे. ही कपात रद्द करुन शहराला दररोज समान व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करावा, अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा नाना काटे यांनी दिला आहे.

भाजप नगरसेवक प्रा. केंदळे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पवना धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठा असताना देखील अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. समान पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक सल्लागार आतापर्यंत नेमले. स्काडा आणि चोवीस तास पाणीपुरवठा योजना हाती घेतली.

पाणी पुरवठ्यावर महापालिका वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, प्रशासन जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करत आहे. केवळ लोकसंख्या वाढ आणि तांत्रिक कारणे सांगून प्रशासन दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी नकार देत आहे. आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागातील सर्व अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांची चौकशी करावी, अशी मागणी प्रा. केंदळे यांनी केली आहे.

आठवड्यातून एक दिवस पाणी कपात लागू करण्यासाठी आपल्याला प्रशासनाने फोनवरुन विचारणा केली होती. दिवसाआड पाणी कपातीमुळे शहरवासियांना पुरेसे पाणी मिळत होते. त्यामुळे दिवसाआड पाणी कपातीसाठी आपण अनुकूल होतो. परंतु, प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या पाणी विषयक तक्रारी कमी होतील, अशी अपेक्षा आहे.

– राहुल जाधव, महापौर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.