जिल्ह्यात 300 टॅंकरने होतोय पाणीपुरवठा

64 हजार जनावरे छावण्यांमध्ये; जून महिन्यातील परिस्थिती

सातारा  – यंदाच्या जून महिन्यात सातारा जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरचा आकडा 300 पर्यंत पोहचला आहे. त्याचबरोबर माण, खटाव आणि फलटण तालुक्‍यातील 97 चारा छावण्यांमध्ये लहान-मोठी अशी तब्बल 64 हजार जनावरे दाखल झाली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पावसाला सुरुवात न झाल्यास परिस्थिती अधिक भयावह होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांमध्ये यंदा टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये माण तालुक्‍यात सर्वाधिक 116 टॅंकरने 80 गावे आणि 628 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापाठोपाठ खटाव तालुक्‍यात 49 टॅंकरने 57 गावे आणि 184 वाड्यांना 49 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यात 33 गावे आणि एका वाडीला 38 टॅंकरने, खंडाळा तालुक्‍यात 4 गावांना 2 टॅंकरने, फलटण तालुक्‍यात 44 गावे आणि 178 वाड्यांना 50 टॅंकरने, वाई तालुक्‍यात 8 गावे आणि 4 वाड्यांना 7 टॅंकरने, पाटण तालुक्‍यात 2 गावे आणि 7 वाड्यांना 6 टॅंकरने, जावली तालुक्‍यात 14 गावे आणि 12 वाड्यांना 16 टॅंकरने, महाबळेश्‍वर तालुक्‍यातील 7 गावे आणि एका वाडीला 3 टॅंकरने, सातारा तालुक्‍यातील 1 गाव आणि 5 वाड्यांना 2 टॅंकरने, कराड तालुक्‍यातील 10 गावांना 7 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एकूणच ऐन जून महिन्यामध्ये जिल्हयातील 296 टॅंकरने 4 लाख 90 हजार 312 नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची वेळ निर्माण झालेली आहे.

त्याचबरोबर माण, खटाव आणि फलटण तालुक्‍यातील 97 चारा छावण्यांमध्ये 52 हजार 525 मोठी तर 63 हजार 652 जनावरे दाखल करण्यात आली आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत छावण्यांमध्ये दाखल करण्यात येणाऱ्या जनावरांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक माण तालुक्‍यातील 78 छावण्यांमध्ये 51 हजार 183 जनावरे दाखल करण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ खटाव तालुक्‍यातील 14 छावण्यांमध्ये 3 हजार 831 तर फलटण तालुक्‍यात मंजूर 5 पैकी कार्यान्वित 2 छावण्यांमध्ये 8 हजार 638 जनावरे दाखल करण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.