कपातीनंतरही पाणी टंचाईचे ‘विघ्न’ कायम

21 दिवसांत “सारथी’वर 529 तक्रारी : सत्ताधारी, विरोधक निवडणुकीच्या तयारीत गुंग

पिंपरी – गणेशोत्सव संपून आता नवरात्रीचे वेध लागले तरी पिंपरी-चिंचवडकरांवर विस्कळीत पाणी पुरवठ्याचे “विघ्न’ कायम आहे. शहराला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी कपात लागू केली आहे. मात्र, नियोजनाअभावी शहर पाणी टंचाईचा सामना करीत आहे. गेल्या 21 दिवसांत सारथी हेल्पलाईनवर 529 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दुसरीकडे सत्ताधारी भाजपसह विरोधकही विधानसभा निवडणुकीच्या तयारीत गुंग असल्याने जनसामान्यांचा टाहो त्यांना ऐकायला जात नसल्याचे चित्र आहे.

महापालिकेने 20 ऑगस्ट 2019 पासून आठवड्यातून एक दिवस शहरातील विविध भागात पाणी कपात लागू केली आहे. आजअखेरीस मागील 25 दिवसांत महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर 529 तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. दिवसाला सरासरी 21 ते 23 तक्रारी प्राप्त होत आहेत. महापालिकेकडून 7 ते 19 ऑगस्ट या कालावधीत दररोज पाणी पुरवठा केला जात होता. त्यावेळी दिवसाला सरासरी 25 ते 30 तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केल्याने तक्रारी कमी होतील, असा पाणी पुरवठा विभागाने केलेला दावा फोल ठरला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शहरवासियांवर बारामाही पाणी कपात सहन करण्याची वेळ आली आहे. पवना धरणातील पाणी साठा कमी झाल्याने 1 मार्च 2019 पासून शहरवासियांना आठवड्यातून एकदा पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र, तीव्र उन्हामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्‌याने घट झाली. त्यामुळे 6 मे पासून दिवसाआड पाणी कपातीचे संकट शहरवासियांवर ओढावले. पावसाने यंदा उशिराने हजेरी लावूनही सरासरी ओलांडली. एवढेच नव्हे तर पवना धरण यंदा तीनदा शंभर टक्के भरले. धरणातून पाणी विसर्ग करावा लागल्याने दोन दिवस शहरात पूरपरिस्थिती होती. एकीकडे शहरात पाणी पाणी झाले असताना दुसरीकडे दिवसाआड पाणी कपात सुरूच राहिल्याने विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी आंदोलन केल्याने अखेर 7 ऑगस्टपासून दररोज पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर पाणी पुरवठ्‌याचे नियोजनच कोलमडले.

सहा तास चर्चा, सूक्ष्म नियोजन, परिणाम शून्य
या काळात अभूतपूर्व पाणी टंचाई शहरवासियांना सहन करावी लागली. अवघ्या बारा दिवसांत महापालिकेने निर्णय बदलत 19 ऑगस्टपासून पुन्हा आठवड्यातून एक दिवस पाणी कपात सुरू केली. त्यावरुन महापालिकेची सर्वसाधारण सभा गाजली. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी महापालिका प्रशासनावर आगपाखड केली. टॅंकर लॉबीसाठी पाणी टंचाई केली जात असल्याचा
आरोपही झाला.

सलग सहा तास पाणी प्रश्‍नावर चर्चा झाली. ही सभा तहकुबीची नामुष्की महापौर राहुल जाधव यांच्यावर ओढावली होती. या सभेत नगरसेवकांच्या तक्रारींवर खुलासा करताना आयुक्‍त हर्डीकर यांनी 24 ऑगस्टपर्यंत सूक्ष्म नियोजन करुन पाणी पुरवठा सुरळीत करु, अशी हमी दिली होती. विस्कळीत पाणी पुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत स्थापत्य, उद्यान आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांची सेवा पाणी पुरवठा विभागाकडे वर्ग करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले होते. मात्र, महासभेनंतर प्रशासन पुन्हा सुस्तावले. गणेशोत्सवाच्या काळातही शहरवासियांना पुरेसे पाणी मिळाले नाही. दापोडी, थेरगाव, आकुर्डी, चऱ्होली, मोशी, चिंचवडगाव, बिजलीनगर, किवळे, संत तुकारामनगर या भागामध्ये अपुऱ्या दाबाने व कमी वेळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. लोकप्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे त्यांचेही या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष झाल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

धरणातून विसर्ग सुरू

एकीकडे शहरावर पाणीकपात लादण्यात आली आहे, तर दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण तुडुंब भरले आहे. पवना धरणातून पाणी सोडले जात असून शुक्रवारी सायंकाळी 5700 क्‍यूयेक्‍स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात होता.
यामुळे पवना नदी दुथडी भरुन वाहत आहे.

महापालिकेने चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. मात्र दररोज चोवीस मिनिटे पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. पितृपंधरवडा, नवरात्रोत्सवात महिला वर्गाला जादा पाण्याची गरज भासते. गणेशोत्सव कसाबसा पार पडला. परंतु, पाणी टंचाईमुळे पुढे येऊ घातलेल्या सणांची चिंता महिला वर्गाला सतावत आहे.

\
– उज्ज्वला मोहिते, संत तुकारामनगर, पिंपरी.

महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर पाणी पुरवठा विषयक येणाऱ्या तक्रारींची संख्या जास्त दिसत असली तरी एकच नागरिक दोन-तीन वेळा तक्रारी करतात. दररोज पाणी पुरवठ्याच्या वेळी होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण आठवड्यातून एक दिवस पाणी कपात लागू केल्यानंतर कमी झाले आहे. आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जात असल्याने तांत्रिक अडचणी देखील कमी येतात.

– मकरंद निकम, सह शहर अभियंता, पाणी पुरवठा विभाग.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)