माणमधील 32 गावांचा पाणीप्रश्‍न अखेर निकाली 

उत्तर माणधील या गावांना मिळणार पाणी…
जयकुमार गोरेंचा दावा; आंधळी धरणातून पाणी उचलून देण्यासाठी 350 कोटी निधी मंजूर

सातारा – माण तालुक्‍याच्या उत्तर भागातील पाण्यापासून वंचित राहिलेल्या 32 गावांना आंधळी धरणातून पाणी उचलून देण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने आज प्रशासकीय मान्यता दिली. आमदार जयकुमार गोरे यांनी सादर केलेल्या या योजनेला 350 कोटींचा निधीही जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाचे माण तालुक्‍यात फटाके फोडून आणि मिठाई वाटून स्वागत करण्यात आले.

निर्णयाविषयी गोरे म्हणाले, “”मी विधानसभेत गेल्यापासून या योजनेसाठी मोठा निधी मिळवला. या योजनेच्या वाढीव खर्चाला भाजप- शिवसेना सरकारने सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात खटाव तालुक्‍यातील नेर धरणात पाणी आणून येरळा नदी प्रवाही करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात आंधळी धरणात पाणी आणून माणगंगा नदी प्रवाही करण्यात येणार आहे. नदीवरील बंधारे भरून घेण्यात येणार आहेत.”

लोकसभा निवडणुकीवेळी मी राजकीय कारकीर्द पणाला लावत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी मिळवून देण्यापासून खासदार करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. माढ्याचा खासदार निवडून आणण्याचा शब्द आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला माण- खटावचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी मदत करण्याचा शब्द दिला होता. माण तालुक्‍याच्या उत्तर भागातील 32 गावांना आंधळी धरणातील पाणी उचलून देण्यासाठी जिहे- कठापूरची सुधारीत योजना त्यांच्यापुढे मांडली. आंधळी धरणातून पाणी उचलून टाकेवाडी परिसरातील उंच ठिकाणी साठवून या 32 गावांना देण्यासाठी मी निधीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही आज प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेतला.

योजनेचे सर्वेक्षण आणि इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होऊन विक्रमी वेळेत मान्यता आणि निधी मिळणारी ही राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच पाणी योजना आह, असा दावा त्यांनी केला. या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी माझ्या पाठपुराव्याला न्याय दिला आहे. या योजनेमुळे खटाव तालुक्‍यातील 11हजार 700, माण तालुक्‍यातील 15 हजार 800 हेक्‍टर क्षेत्रासह उत्तर माणमधील वाढीव तीन हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

धुळदेव, हिंगणी, म्हसवड, भाटकी, खडकी, वरकुटे म्हसवड, पळशी, रांजणी, जाशी, राणंद, सोकासन, शेवरी, वडगाव, बिदाल, बोडकी, शिंदी, दहिवडी, गोंदवले बुद्रुक, गोंदवले खुर्द, मनकर्णवाडी, दानवलेवाडी, मार्डी, भालवडी, इंजबाव, संभूखेड, पर्यंती, हवालदारवाडी, खुटबाव, कारखेल, शिखर शिंगणापूर, वावरहिरे, लक्ष्मीनगर, तोंडले, जाधववाडी, राजवडी, मोगराळे, बिजवडी, पांगरी, टाकेवाडी, पाचवड, हस्तनपूर, थदाळे आणि वाड्यावस्त्या.

Leave A Reply

Your email address will not be published.