गणेश मंडळांना समाधान वाटेल, असा मार्ग काढू – पालकमंत्री

पुणे – डॉल्बीबाबत न्यायालयाचे निर्णय महत्त्वाचे आहेत. नियम तोडून डॉल्बी लावले, तर गुन्हे दाखल करावे लागतील. विसर्जनाला रात्रभर वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. याबाबत प्रशासनाशी बोलणे सुरू आहे. त्यातून मंडळांना समाधान वाटेल, असा मार्ग काढण्यात येणार आहे, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या पुणे विभागाचा पारितोषिक वितरण झाले. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, प्रवीण चोरबेले, राजाभाऊ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाला 51 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देत प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. सिटी पोस्ट चौकातील महाराष्ट्र तरुण मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, गुरुवार पेठेतील वीर शिवराय मित्र मंडळाने चौथे, तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी 156 पैकी 98 मंडळांनी पारितोषिके मिळविली असून ट्रस्टतर्फे 12 लाख 6 हजार रुपयांची बक्षिस देण्यात आली.

गणेशोत्सवात सात दिवस मंडळांचे देखावे रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली आहे. आपण विसर्जन मिरवणूक वेळेवर संपवायचा आदर्श घालून द्यायला हवा. पारंपरिक वाद्य वाजवून मंडळे पुढे गेल्यास मिरवणूक वेळेत संपेल, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.

स्पर्धेच्या परीक्षणासाठी डॉ.अ.ल.देशमुख, विजय चव्हाण, पराग ठाकूर, अनिल घाणेकर, मधुकर जिनगरे, सुरेश वरगंटीवार, गजानन सोनावणे, बापू पोतदार, सुधीर दारव्हेकर, जयश्री बोकील यांनी काम पाहिले. हेमंत रासने यांनी प्रास्ताविक केले. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×