भंडलकर नगर भागातील महिला संतप्त
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने लष्कर पाणीपुरवठा केंद्रावर आंदोलन
हातात हंडे घेऊन पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात घोषणाबाजी
मांजरी : मांजरी बुद्रुक येथील भंडलकरनगर भागात पाण्याची मोठी समस्या आहे. हा भाग महापालिकेत समाविष्ट असूनही नागरिकांना पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पुरेसं पाणी मिळावं, या मागणीसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने पालिकेच्या लष्कर पाणी पुरवठा केंद्रावर आंदोलन केलं.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मांजरी बुद्रुक-शेवाळेवाडीचे प्रभाग प्रमुख संतोष भंडारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महिलांनी हातात हंडे घेऊन हे आंदोलन केलं. मांजरी बुद्रुक मधील भंडलकर नगर हा भाग महापालिकेत जाऊन दोन वर्षे झाली आहेत. तरीही या भागाला महानगरपालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येत नाही.
भंडलकर नगर भागात सुमारे 800 ते 1000 कुटुंब राहतात. या भागातील नागरिकांना खास करून महिला भगिनींना पाण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत असताना चांगला पाणी पुरवठा होतो. तोच पाणी पुरवठा महापालिकेत गेल्यानंतर का होत नाही, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित महिलांनी केला.
“हा भाग ग्रामपंचायत मध्ये असताना 15 ते 18 टॅंकर पाणी येथे येत होते. मात्र, महापालिकेत गेल्यानंतर पुरेसं पाणी मिळणे अपेक्षित असताना मिळणारे पाणीही कमी झाले. लष्कर पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार मागणी करूनही पाणी पुरवठा करण्याबाबत योग्य अशी कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे आम्हांला आज या हंडा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला आहे. यानंतरही पाणी पुरवठा केला नाही.तर आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल.”
– संतोष भंडारी (मांजरी बुद्रुक-शेवाळेवाडी प्रभाग प्रमुख, (शिवसेना, उ. बा.ठा))
एकीकडं पाण्याची कमतरता नसल्याचं महापालिकेकडून सांगितलं जातं. तर काही भागात मात्र, पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळं भंडलकर नगर भागातील नागरिक संतप्त झाले आहेत.