नगर जिल्ह्यात जलसंकटाचे सावट ; धरणांमध्ये अवघा 11 टक्‍केच जलसाठा

 मे महिन्यात तीव्र पाणीटंचाई

नगर: संपूर्ण नगर जिल्ह्यावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्ह्यातील धरणांसह अन्य जलाशयांमध्ये केवळ 11.17 टक्‍के पाणी शिल्लक आहे. आता उन्हाची तीव्र दिवसेंदिवस वाढ लागली असून असलेल्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन देखील झपाट्याने होत आहे.त्यामुळे धरणे खपाटीला गेले आहेत. अजून दीड महिने उन्हाळ्याचे जायचे आहे. या धरणांमधून सध्या पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था होत आहे. परंतू जलसाठ्या स्थिती पाहण्यानंतर यंदा मे महिन्याच्या अखेरीला जिल्ह्यात सर्वदूर तीव्र पाणीटंचाईला तोंड द्याव लागणार असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात भंडारदरा, निळवंडे, मुळा या मोठ्या प्रकल्पांसह मध्यम प्रकल्पांची पाणीसाठ्याची एकूण क्षमता 59 हजार 135 दलघफु आहे. तर उपयुक्‍त पाणीसाठा हा 50 हजार 992 दलघफु आहे. सध्या या सर्व प्रकल्पांमध्ये केवळ 5 हजार 698.10 दलघफु पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला 21 हजार 468.63 दलघफु पाणीसाठा होता.गेल्या वर्षीच्या तुलनेने तब्बल 15 हजार 770.53 दलघफु पाणीसाठा कमी आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील पाणीसाठ्याची ही स्थिती असल्याने पुढील दीड महिने हा जलसाठा सांभाळून वापरावा लागणार आहे. अन्यथा पाणीटंचाईची झळ नगर शहरासह अन्य शहरांना बसल्याशिवाय राहणार नाही. सध्या जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने टॅंकरच्या संख्येत वाढ होत आहे. सातशेपर्यंत टॅंकरची संख्या गेली असून पुढील काळात ही संख्या एक हजारांपर्यंत जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्या दृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.

यंदा धरणांच्या लाभक्षेत्रात काय तो पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा ऑक्‍टोबर महिन्यांपासून पाणीटंचाईची ओरड सुरू झाली. यंदा जिल्ह्यात 63 टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरपासून टॅंकर सुरू झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षाही यंदा पाण्याची स्थिती गंभीर होण्याची शक्‍यता आहे. भंडारदरा धरणांवर उत्तरेतील तीन ते चार तर मुळा धरणामुळे दक्षिणेतील पाच तालुक्‍यांची पाण्याची तहान भागविण्यात येत आहे. चार तालुक्‍यांना कुकडीचे पाण्याचा आधार आहे. सध्या कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडणयात आले आहे. जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे.

भूजलाचा आधार
जलाशयांमध्ये केवळ 11 टक्के पाणी शिल्लक असले तरी उन्हाळ्यात जास्त पाणी कपात केली जाणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु, येणारा पावसाळा असमाधानकारक राहिल्यास परिस्थिती बिघडेल. भूजलाची अवस्था चांगली आहे. जलसंकटावर त्यामुळे मात करता येईल असे जाणकारांचे मत आहे.

पाणी काटकसरीने वापरा
जलसाठ्याची स्थिती पाहता पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. विशेषतः शहरी भागांना मुबलक पाणीपुरवठा होत आहे. पण ग्रामीण भागाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. याची जाणिव ठेवून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. महापालिकेकडून अद्याप पाणी कपातीचा निर्णय घेतला नाही. परंतू येणाऱ्या काही दिवसांत तो निर्णय घेण्याची शक्‍यता आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.