सुपरहिट टिकटॉक

सोशल मीडियावर सध्या तुफान लोकप्रिय असलेल्या टिकटॉक या मोबाईल व्हिडीओ अॅप्लिकेशने तरुण-तरुणींना अगदी झपाटून टाकले आहे. याच टिकटॉकवर आपले अकाउंट उघडून तरुण-तरुणी डंबिंग व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करतात. टिकटॉकच्या या फीवरने सगळ्यांनाच एक कलाकार बनवून टाकले आहे. टिकटॉकवर एखादा डबिंग व्हिडिओ तयार करायचा आणि तो व्हॉट्‌सअॅप-फेसबुकच्या स्टेटसवर टाकून व्हायरल करायचा असा फंडा सुरु असल्याचं दिसतंय.

आपणही आयुष्यात एकदा का होईना सिनेमाच्या पडद्यावर किंवा टीव्ही स्क्रीनवर झळकावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्याची संधी टिकटॉकने वापरकर्त्यांना दिली असून स्मार्टफोनद्वारे का होईना पण आपले कलागुण जगासमोर मांडण्याचं टिकटॉक प्रभावी माध्यम बनलं आहे. टिकटॉकवर टाकलेल्या व्हिडिओला मिळणार प्रचंड प्रतिसाद पाहून टिकटॉक वर व्हिडीओ बनवणाऱ्यांची संख्या सुध्दा वाढू लागली. अशा व्हिडीओंच्या माध्यमातून मोठया पडद्यावर चमकण्याची संधी मिळण्याची आशा असलेले, आपल्याकडे चांगले कलागुण असूनही संधी न मिळाल्याने नावारूपाला येऊ न शकलेले, अनेक हिडन टॅलेंट आता ‘टिकटॉक’च्या मदतीने जगासमोर आपले कलागुण मांडत आहेत.

भारतामध्ये टिकटॉकला सुरुवातीला म्युझिक-ली या नावाने ओळखलं जायचं. वेगवेगळे फिल्मी संवाद, गाणी आणि संगीत यावर लिपसिंकिंग करून किंवा नृत्य, हावभाव करून आपले व्हिडीओ तयार करण्याची संधी देणाऱ्या या अॅपला म्हणता म्हणता भारतामध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली. आजघडीला जगभरातील टिकटॉकच्या एकूण वापरकर्त्यांपैकी 39 टक्के वापरकर्ते भारतात आहेत. म्हणजेच, जवळपास 20 कोटी भारतीय वापरकर्त्यांची टिकटॉकवर नोंद आहे. एका सर्वेक्षणाद्वारे अशी माहिती समोर आली आहे की दर महिन्याला सरासरी 5 कोटी सक्रिय वापरकर्ते असलेल्या टिकटॉकवर दररोज सरासरी 29 मिनिटे घालवली जात असून टिकटॉकच्या एकूण वापरकर्त्यांपैकी 78 टक्के जण 25 वर्षांच्या आतील आहेत. ही मंडळी दिवसातून किमान पाच वेळा टिकटॉकचं अॅप हाताळतात.

आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईचा एखाद्या अॅपवर वावर असेल तर साहजिकच त्याचा गैरवापर होण्याची शक्‍यता देखील वाढते. गैरवापराच्या या समस्येचे ग्रहण टिकटॉकला देखील लागले असून काही लोकांकडून टिकटॉकच्या माध्यमातून अश्‍लील भाषा, हिंसाचार, द्वेषमूलक वक्तव्य यांचा प्रसार होताना दिसत आहे. याबरोबरच प्रायव्हसीच्या मुद्‌द्‌यावरुन देखील टिकटॉक वापरकर्त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागत असून किशोरवयीन मुली, तरुणी, गृहिणी यांचे व्हिडीओ परस्पर अन्य व्यक्तींपर्यंत पोहोचत असून त्याचा गैरवापर केला जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. एकंदरीतच आपल्यातील कलागुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी टिकटॉक हे एक प्रभावी माध्यम असले तरी देखील त्याचा वापर सबूरीनेच करायला हवा.

– ऋषिकेश जंगम

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.