मुंबईकरांवर ओढावणार जलसंकट

पाणी जपून वापरण्याचा पालिकेचा सल्ला

मुंबई – जून महिन्याचा शेवट उजाडला असला तरी पावसाने अजुन म्हणावी तशी साथ न दिल्याने मुंबईकरांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. राज्यात पावसाचा जोर अजूनही दिसत नाही आहे. राज्यातल्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती उद्‌भवली आहे. त्यातच मुंबईत देखील जुलै महिन्याच्या अखेर पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याच्वी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

या पाणी साठ्यातून मुंबईकरांना जुलैअखेर पर्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा करता येईल अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्याच बरोबर महापालिकेने दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. सध्याची परिस्थिती पाहता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील राखीव साठ्यातून पाणीपुरवठा केला जातोय. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा अंत्यत कमी म्हणजे 23.19 टक्के पाणीसाठा आहे. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणामधून 3,650 दशलक्ष लीटर पाणी जलशुद्धीकरण संकुलात आणलं जातं. शुद्धीकरणानंतर मुंबईकरांना 3,515 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. यापैकी 135 दशलक्ष लिटर पाणीथ हे गळतीमुळे वाया जाते. या सातही तलावांमध्ये 26 जूनला सकाळी 6 वाजता सुमारे 73 हजार 784 दशलक्ष लिटर पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी 26 जूनला 2 लाख 53 हजार 043 दशलक्ष लिटरर पाणी तलावात होते.

दुसरीकडे ठाण्याला पाणी पुरवणाऱ्या बारवी धरणातही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत केवळ 14.90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे ठाण्यात आधीपासूनच 30 टक्के पाणीकपात लागू केली आहे. यामुळे नागरिक आधीच चिंतेत आहेत. दरम्यान येत्या 10 ते 12 दिवसात जोरदार पाऊस झाल्याशिवाय मुंबईसह ठाण्यातल्या नागरिकांची पाणीटंचाईतून सुटका होणार नाही हे निश्‍चीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)