महसूल मंत्र्यांसह भाजपच्या दोन आमदारांचे भ्रष्टाचार उघड करणार

जयंत पाटील यांचा इशारा

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील हवेली व बालेवाडी येथील कथित भूखंडाच्या घोटाळ्यांची पोलखोल केली असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा महसूल मंत्र्यांबरोबरच भाजपाच्या आणखी दोन आमदारांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी विधानभवनातील पत्रकार परिषदेमध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील हवेली व बालेवाडी येथील भूंखड घोटाळा उघडकीस आणला होता. आज पुन्हा पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांचे आणखी एक वादग्रस्त प्रकरण आपण शुक्रवारी विधानसभेत मांडणार आहोत.

त्याचसोबत भाजपाच्याच दोन आमदारांच्या घोटाळ्यांची प्रकरणेही उघड करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यातील भूखंड घोटाळ्यांप्रकरणी आपण न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

पदावर नेमण्यासाठी “रेटलिस्ट’

सार्वजनिक बांधकाम विभागात तर पदांवर नेमण्याची रेटलिस्टच आहे. पंचवीस लाख रूपयांपासून ती सुरू होते. कोल्हापूर आणि मुंबई येथे “कलेक्‍शन’साठी माणसे नेमली असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा त्या पैशातून विरोधी पक्षाच्या लोकांची फोडाफोडी असा हा प्रकार असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.