व्हीटीएस यंत्रणा सुरू : तीन कर्मचाऱ्यांना आगार प्रमुखांकडून नोटीस
पिंपरी (प्रतिनिधी)- राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) वतीने आगारातील रस्त्यावर धावत असलेल्या एस.टी बसची योग्य माहिती, बसच्या वेगाची मर्यादा व अन्य बाबींची माहिती मिळावी यासाठी एस.टी कडून सुरु करण्यात आलेल्या व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम (व्हीटीएस) वल्लभनगर आगाराकडून कार्यान्वित होत असल्याचे अखेर निदर्शनास आले. पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारात या यंत्रणेच्या साहाय्याने आगारप्रमुख कुठेही प्रवास करत असलेल्या एसटीवर म्हणजेच पर्यायाने त्यावरील चालक-वाहकांवर “वॉच’ ठेऊन आहेत. याच यंत्रणेच्या आधारे आगार प्रमुखांनी तीन चालकांना बसची वेग मर्यादा व अन्य कारणासाठी नोटीस दिली आहे.
एस.टी च्या सेवेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विविध उपाययोजना करण्यात आले. त्यात, स्मार्टकार्ड, व्हीटीएस सिस्टम व अन्य उपक्रम हाती घेण्यात आले आहे. लालपरीला चांगला प्रतिसाद मिळावा हा उद्देश आहे. मात्र, यामध्ये बऱ्याच अडचणी येत असल्याने यावर टीकाही होत आहे. यापैकी व्हीटीएस सिस्टम मोठ्या प्रमाणात टिकेची धनी ठरली आहे. कारण गेल्या वर्षीपासून ही सिस्टम सुरु करण्यात आली होती. मात्र, याचे परिणाम दिसत नसल्याने हा प्रयोग फसला की काय असा प्रश्न उपस्थित होत होता.
अजूनही बसविल्या नाहीत स्क्रीन
पुणे विभागात स्वारगेट, शिवाजीनगर व वल्लभनगर येथील बसेसना व्हीटीएस सिस्टम बसवण्यात आली आहे. वल्लभनगर आगारात एकूण 56 गाड्यापैकी 40 बसेसला ही सिस्टम बसवण्यात आली आहे. आगाराच्या अग्रभागी याबाबत माहिती देण्यासाठी स्क्रीन बसवण्यात येणार होत्या त्या अजूनही बसवलेल्या नसल्याने व्हीटीएसचा प्रयोग बारगळला की काय? असा प्रश्न निर्माण होत होता. मात्र, अलिकडच्या काळत येथील आगारातील तीन कर्मचाऱ्यांना आगार प्रमुख यांनी व्हीटीएस सिस्टमद्वारे नोटीस दिल्याने सिस्टम सुरु असल्याचे समजले. व्हीटीएस प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात नियत्रंण कक्षाची स्थापना केली आहे. यामाध्यमातून व्हीडियो कॉलच्या सहाय्याने एस.टी बसचे निरीक्षण केले जाते. यात वाहनाचा वेग, आगमन, निर्गमन याचा अहवाल सुद्धा तयार करण्यात येतो. मात्र या प्रणालीचा फायदा अजूनही जसा मिळावा तसा प्रवाशांना मिळत नसल्याने ह्या प्रणालीने आपली उपयोगिता सिद्ध केलेली नाही. परंतु एसटी कुठे आहे, तिचा वेग काय, कुठे किती वेळ थांबली या बाबी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळू
लागल्या आहेत.