पारनेरमध्ये तरुणावर तलवारीने खुनी हल्ला

कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह

पारनेर तालुक्‍यातील निघोज येथील संदीप वराळ हत्याकांडाच्या घटनेची दाहकता नागरिकांच्या मनावर अद्यापही कायम आहे. या घटनेने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

पारनेर  – जुन्या भांडणाच्या कारणातून पारनेरमध्ये 22 वर्षांच्या तरुणावर आंबेडकर चौकामध्ये दोघांनी तलवारीने खुनी हल्ला करत जखमी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6.30 च्या सुमारास घडली. या हल्ल्यात सौरभ उर्फ बंडू भिमाजी मते हा तरुण गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी जखमीचे चुलते रामदास सोपान मते यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात चंद्रकांत कावरे, गणेश चंद्रकांत कावरे व संग्राम चंद्रकांत कावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील गणेश कावरे यांस पुणे येथून तर संग्राम कावरे यास जखमी अवस्थेत अटक करण्यात आली. चंद्रकांत कावरे मात्र अद्याप फरार आहेत.

पारनेरमध्ये दोन गटांमध्ये संघर्ष सुरू होता. याआगोदरही एकमेकांना बेदम मारहाण करण्याच्या घटना झालेल्या आहेत, त्यातूनच हा हल्ला झाला असण्याची शक्‍यता आहे. शुक्रवारी (दि.15) सकाळी आंबेडकर चौकातील चहाचे दुकान उघडून ते सुरु करत असताना बंडू मते यासोबत दोघांनी बातचीत सुरू केली त्याचेच रूपांतर हाणामारीत होऊन दोघांनी त्याच्या हातापायावर तलवार तसेच चॉपरने वार केले.

दोघांच्या तावडीतून निसटण्याचा बंडू मते यांनी प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून दोघांनी आंबेडकर स्मारकासमोर त्याच्यावर तलवारीने वार केले. घटनेची माहिती समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर हे दोघेही पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी 1.30 वाजता घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली.

या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी नगरहून फॉरेन्सिक लॅबसह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. बंडू मतेच्या हाताला, मनगटाला जखम झाली असून मनगटावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समजते. हल्ला केल्यानंतर पसार झालेल्या हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी पथके तयार केली आहेत. बंडू मते याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.