राजेंद्र वाघमारे
नेवासा – त्रिंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांना सकाळपासून दुपारपर्यंत बस गाड्या उपलब्ध झाल्या नसल्यामुळे संतप्त महिला-पुरुष प्रवाशांनी नेवासा बस स्थानकात उग्ररुपधारण करत तब्बल तासभर स्थानकातील बसेस अडविल्याने बस स्थानकाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सोमवारी (दि.५) रोजी सकाळपासूनच बस वाहतूक सेवा नेवासा आगाराची विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली बसस्थानक विभागाने प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था न करता प्रवाशांना साधे समाधानकारक उत्तरही न देता व्यवस्थापनाने चक्क हातवर केल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आणि या प्रवाशांचा अखेर संयम सुटल्यामुळे शेकडो प्रवाशांनी बस स्थानक प्रशासनाला धारेवर धरत तब्बल तासभर बसेस नेवासा बसस्थानकांत अडवून ठेवल्या अखेर या प्रवाशांना बस उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे प्रवासीवर्गाने आपले आंदोलन अखेर मागे घेत ढिसाळ कारभारात सुधारणा करण्याची मागणी केली.
या आंदोलनात हरिभाऊ गुरुकुल, रतनबाई नांगरे, बाळासाहेब सानप,शोभा ढगे, अशोक सरगर, निर्मला भांगे, मंदा थिटे, मीराबाई लबडे, इंदूबाई तनपुरे यांच्यासह शेकडो प्रवासी या आंदोलनात सहभागी होवून नेवासा बसस्थानकाचा कारभार चव्हाट्यावर आणला.
“आज आम्ही बस स्थानकाच्या भोंगळ कारभारला पूर्णतःहा वैतागून गेलो एसटी महामंडळाच्या बस फेऱ्यांचे नियोजन बसस्थानक प्रशासनाकडून व्यवस्थित करण्यात येत नसून बसस्थानक प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे दररोज प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतो.” – हरिभाऊ गुरुकुल, प्रवासी
“आम्हाला सकाळ पासूनच दुपार होईपर्यंत बस स्थानक प्रशासनाकडून गाड्या बाबत खोटी महिती देण्यात आली तसेच काही तास उन्हात आम्ही ठिय्या केल्याल्यानंतर हे प्रशासन जागी झाले अपमानास्पद वागणूक आम्हाला देण्यात आली.” – रतनबाई नांगरे, महिला प्रवासी
बस स्थानकांवर एवढा मोठा राडा सुरू असताना अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बस डेपो मधील आगार प्रमुख रामनाथ मगर व कर्मचारी तसेच इकडे फिरकले सुद्धा नाही या ठिकाणी असलेले वाहतूक नियंत्रक काकासाहेब पोटे यांनी प्रवाशी वर्गाची समजूत काढत त्यांना गाडी उपलब्ध करून दिली.