नगर (प्रतिनिधी) – स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियानात यश संपादन करण्यासाठी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे, मनपा कर्मचाऱ्यांनी घरगुती कचऱ्याचे विलगीकरण करुन कंपोस्ट खत तयार करण्याचे नियोजन करावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर तसेच अस्वच्छता पसरविणाऱ्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मनपाने ठिकठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला असून आता रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सिसिटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी विभागप्रमुखांच्या साप्ताहिक आढावा बैठकीत दिले.
आयुक्त मायकलवार म्हणाले, शहरातील दैनंदिन कचरा उचलला जात आहे. परंतु ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण होत नसल्याने त्यावर प्रक्रिया करणे व विल्हेवाट लावणे अवघड होत आहे. त्यादृष्टीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. यासाठी मनपा कर्मचाऱ्यांना घरगुती कंपोस्ट खत प्रकल्प निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत.
या माध्यमातून इतरांनीही कंपोस्ट खत निर्मिती करावी, त्यामुळे आपल्या बाग बगीच्यांना ते खत वापरता येईल. या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी घंटागाडीमध्ये सुविधा उपलब्ध नाही.
यासाठी नगर शहरातील जनतेला दिवसाआड सुका व ओला कचऱ्याचे नियोजन करून जनतेमध्ये जनजागृती करावी. यामुळे ओला व सुका कचरा विलगीकरण होण्यास मदत होईल. नागरिकांनी या अभियानामध्ये भाग घेवून नगर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करावी. तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत शहरामध्ये नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी नियोजन करावे व विद्यार्थ्यांची स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी स्पर्धा घेण्यात यावी, असे ते म्हणाले.
या बैठकीस उपायुक्त संतोष लांडगे, सचित राऊत, सिनारे, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, वैद्यकिय आरोग्याधिकारी डॉ. सतिष राजूरकर, घनकचरा विभाग प्रमुख डॉ. नरसिंह पैठणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, नगररचनाकार राम चारठाणकर, अभियंता वैभव जोशी, प्रभाग अधिकारी अशोक साबळे, अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळी आदी उपस्थित होते.