“दहशतवादी मुंबईत येऊन कट रचत होते त्यावेळी राज्याचं एटीएस झोपलं होतं का?”; भाजपची सरकारवर टीका

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत येऊन जान मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता भाजपाकडून या प्रकरणी तीव्र टीका केली जाऊ लागली आहे. “हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलीस काय करत होते?” असा सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पाकिस्तानात झाले असून दाऊदचा भाऊ अनिस अहमद त्यांना पैसा पुरवत होता, असे आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले. “नवरात्र, रामलीला आणि उत्सव काळात घातपात घडवणाऱ्या आणि त्याचा कट करणाऱ्या दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केली. त्यापैकी जान मोहम्मद शेख आणि समीर या दोघांना महाराष्ट्रातून अटक केली. त्यातल्या एकाला तर धारावीत अटक केली. हिंदूंच्या सणांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट करणाऱ्या या दहशतवाद्यांना दाऊदचा छोटा भाऊन अनिस अहमद पैसा पुरवत होता. यांचं प्रशिक्षण पाकिस्तानमध्ये झालं”, असे ते म्हणाले.

दरम्यान, आशिष शेलार यांनी विशिष्ट वर्गासाठी राज्य सरकार मवाळ भूमिका तर घेत नाही ना? अशी गंभीर शंका उपस्थित केली आहे. ” मुंबईत, धारावीत अशा दहशतवाद्यांचा निवास, कटकारस्थान सुरू होतं. दिल्लीहून येऊन विशेष पथकानं त्यांना अटक केली. मग राज्यातलं एटीएस काय झोपलं होतं का? अदखलपात्र गुन्ह्यात केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे, पत्रकारांना हात नाही पाय लावू असे म्हणणारे किंवा राज्यातल्या विद्यमान आमदाराविरोधात लुकआऊट नोटीस काढणारे आमचे पोलीस या दहशतवाद्यांच्या बाबतीत काय करत होते. याची माहिती राज्याच्या पोलिसांना, गृहमंत्र्यांना होती का? होती तर त्यावर त्यांनी काय भूमिका घेतली? की मग विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असं राजकीय प्रकरण तर नाही ना?”, अशी शंका आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

“जेव्हा पोलिसांचं लक्ष राज्यकर्ते नको त्या विषयात घालायला लावतात, तेव्हा गंभीर विषयांकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतं हे आपल्याला दिसतंय. कुठे संपादकाला अटक कर, कुठल्या आमदारावर लुकआऊट नोटीस काढ, केंद्रीय मंत्र्याला अटक कर यामध्ये राजकीय दबावामुळे पोलिसांना लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे गंभीर विषयांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. आमचं पोलीस खातं क्षमतावान आहे. त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. पण सौदेबाजी, वसुलीबाजी करताना आमच्या पोलिसांच्या डोक्यावर मिऱ्या वाटाव्यात असे राज्य सरकार वागतं, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते”, असे देखील आशिष शेलार म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.