मुंबई : दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांसंदर्भात एक मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. मुंबई लोकल पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आली आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. घातपाताचा कट यशस्वी करण्यासाठी राज्यातील अनेक महत्त्वाची ठिकाणेही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा कट यशस्वी करण्यासाठी अनेक ठिकाणी विस्फोटकं पोहोचवण्यात आली असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी स्फोटकं लपवली आहेत. त्यापैकी काही स्फोटकं तपासयंत्रणांनी हस्तगत केली आहेत. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी मुंबईत वास्तव्यास होता. मुंबईतील सायन परिसरात जान मोहम्मद अली शेख हा वास्तव्यास होता. नेमका या कटात त्याचा कितपत सहभाग होता? याबाबत सध्या तपास सुरु आहे.
समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, जान महोम्मद अली शेख आणि त्याच्या साथीदारांना दाऊद इब्राहिमकडून रसद पुरवली जात होती. त्यामुळे जान महोम्मदचे आणखी कुणी साथीदार आहेत का? त्यांचा नेमका मनसुबा काय आहे? याचा छडा लावण्याचं तपास यंत्रणेसमोर आव्हान आहे.