पुढील तीन दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबईत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. पुढील तीन तासांत मुंबईत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत चोवीस तासांत २०० मिमी पावासाची नोंद झाली आहे. आजही मुसळधार पाऊस होणार आहे. पुढील तीन तास मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. मुंबईत शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती. शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले होते.

दरम्यान, दक्षिण गुजरात आणि लगतच्या प्रदेशात तयार झालेल्या चक्रवाती वर्तुळाकार (सायक्लोनिक सक्र्युलेशन) स्थितीमुळे दोन दिवस सलग पाऊस कोसळत आहे. चक्रवाती वर्तुळाकार स्थितीची तीव्रता रविवारी कमी होणार असली तरी राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रविवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि उर्वरीत मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस पडू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.