भोर -भोर तालुक्यातील भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील श्री वाघजाई मंदिराच्या अलीकडील वळणावरील उंबार्डे गावाच्या हद्दीतील रस्त्यालगतची दरड कोसळून रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक झाला आहे.
नीरा-देवघर धरण भागातील या रिंगरोडवर हिर्डोशी निगुडघर ते वरंध घाटापर्यंतच्या रस्त्यावर गटारे काढलेली नाहीत, दरडी पडलेल्या तशाच आहेत, अनेक पुलांना संरक्षक कठडे नाहीत, सुचना फलकांचा आभाव आहे, झाडेझुडपे वाढलेली, साईडपट्ट्या खोलवर गेल्या आहेत. याबरोबरच येथील डांबरीकरण रखडलेले आहे. पावळ्यात काही ठिकाणी दरडी कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.
भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील हिर्डोशी खोऱ्यात सुमारे 2500 ते 3000 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो, त्यामुळे येथील रस्ते पावसाळ्यात प्रवाशांसाठी जीवघेणे ठरतात. तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यातील भोर ते वरंधा घाट हा 55 किमीचा रस्ता आहे. त्यातील 15 किलोमीटर रस्ता घाटाचा आणि वेडीवाकडी वळणे असलेला तीव्र उताराचा आहे.
पावसाळ्यात या घाटाच्या रस्त्यावर दरड कोसळणे, रस्ता खचणे, रस्त्यावर माती वाहून येणे असे प्रकार घडतात. या वर्षीही घाट रस्त्यांचे काम अपूर्ण असल्याने अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरवंड ते वरंधा घाट रस्त्याचे काम अपूर्ण आहे. हिर्डोशी येथील सोमजाई पूल पावसाळ्यात खचण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्येच खड्डे पडल्याने व साइडपट्ट्या भरल्या नसल्याने प्रवास करणे अवघड होत आहे. कुडली ते दुर्गाडी या रस्त्याचीही हीच स्थिती आहे.
वरंधा घाटापर्यंतच्या रस्त्याचे काही किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, तर काही ठिकाणचे काम सुरू आहे. या रस्त्यावर पाणी येऊ नये, रस्त्यालगत चर काढले आहेत. गटर काढणे, खड्डे भरण्याची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे भोर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जाते.
वरंधा घाटात श्री वाघजाई मंदिराच्या अलीकडे वळणावरील उंबार्डे गावच्या हद्दीतील रस्त्यालगत दरड कोसळून रस्ता खचला आहे. मात्र, 10-15 फुटांचा रस्ता योग्य असल्यामुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही.
-आर. एल. थाणगे,
उपविभागीय अभियंता, भोर