शिक्षण अधिकारी व पंचायत समिती सभापतीची शाळेस भेट
नीरा – येथील प्राथमिक शाळेतील पालकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम विभागाने आज नीरा येथे धाव घेत तात्पुरत्या वर्गखोल्या बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी सुनील कुऱ्हाडे, गट शिक्षण व बांधकाम अधिकारी यांसह अन्य अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या वर्ग खोल्या बांधण्यासाठी खासगी जागा निश्चित केली आहे. यानंतर दोन दिवसांत याबाबत तांत्रिक बाबी पूर्ण करून बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पालकांच्या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कालपासून शाळा बंद झाल्याने पंचायत समिती सभापती रमेश जाधव, उपसभापती दत्तात्रय काळे यांनीही नीरा येथील प्राथमिक शाळेस भेट देत पालकांशी संवाद साधला. रयतच्या परवानगीस उशीर लागणार असल्याने पालकांनी खासगी जागेत शाळा बांधण्याचा प्रस्ताव दिला. लक्ष्मण चव्हाण, राजेश चव्हाण, संपत बंडगर, संपत लकडे, सुरेश जेधे, बबन लकडे व विश्वास लकडे यांनी आपली जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे.
याबाबतची माहिती शिक्षण अधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी पालकांना त्वरित काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, जोपर्यंत प्रत्यक्ष बांधकामास सुरवात होत नाही तोपर्यंत शाळा बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे येथील महिला पालकांनी त्याना निक्षून सांगितले. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे सभापती रमेश जाधव, उपसभापती दत्तात्रय काळे, सदस्य गोरखनाथ माने, सुधीर माने, केंद्रप्रमुख सुरेश लांघी, लक्ष्मण चव्हाण, माजी सरपंच राजेश काकडे, दीपक काकडे, अनिल चव्हाण, राजेश काकडे, सुदाम बंडगर, डॉ. वसंत दगडे, व्यवस्थापन समितीचे गणेश जाधव, योगेंद्र माने, जयश्री शिंदे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला पालकांचा रुद्रावतार
नीरा येथे अधिकारी येणार असल्याने नीरा प्राथमिक शाळेतील मुलांच्या महिला पालक मोठ्या संखेने उपस्थित राहिल्या होत्या. शाळेच्या बांधकामाचा आज निर्णय करून नारळ फोडायचा अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, काही तांत्रिक सोपस्कार पारपडल्यानंतरच बांधकाम सुरू होईल असे अधिकाऱ्यांनी म्हटल्यावर महिलांनी रुद्रावतार धरण करीत अधिकाऱ्यांच्या गाड्यांसमोर ठिय्या मांडला.