कराड – बनवडी, ता. कराड येथील ओरियन फोटो सेन्सिटिव्ह सिस्टीम या कारखान्यातून दीड लाख रुपयांच्या तांब्याची चोरी उघडकीस आली. यासह फिर्यादीच्या कराड मधील घरातील थ्री फेज इलेक्ट्रिक मीटर अज्ञात चोरट्याने चोरून नेले.ही घटना अनुक्रमे बुधवार, दि. 31 जुलै व 22 जुलै रोजी रात्री घडली. प्रदीप विनायक सुखदेव रा. गजानन हौसिंग सोसायटी यांनी अज्ञात चोरट्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी प्रदीप सुखदेव यांचे ओरीयन फोटो सेन्सिटिव्ह सिस्टीम नावाचा बनवडी मध्ये कारखाना असून ते गजानन हाउसिंग सोसायटीमध्ये सध्या राहावयास आहेत. कराड मधील शनिवार पेठेतही त्यांचे आणखी एक घर आहे. 31 जुलै रोजी रात्री
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारखान्यांमधील सुमारे दीड लाख रुपये किंमतीची 300 किलो वजनाची तांब्याची तार चोरून नेली. तसेच दि. 22 रोजी त्यांच्या कराडमधील घरातून दहा हजार रुपये किंमतीचे थ्री फेज इलेक्ट्रिक मीटर चोरून नेले. पुढील तपास पोलीस हवालदार रसाळ करीत आहेत.