करोनाची लाट, महागाईने वाट… सर्व सामान्यांचे कंबरडे मोडणार 

सचिन सुंबे

सोरतापवाडी – गेले अकरा महिने करोना व्हायरसच्या भीतीने सर्वांचीच झोप उडाली होती. त्यावेळी अनेक जणांना प्राण गमवावे लागले. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचे रोजगार गेले. अद्यापही बेरोजगारांना रोजगार मिळालेले नाहीत. आता कुठे परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे, त्यातच महागाईने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सध्या करोनाची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. “करोनाची दुसरी लाट आणि महागाईने लागली वाट’ अशी अवस्था नागरिकांची झाली आहे त्यामुळे जगायच कसे, असा प्रश्‍न सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे.

सध्या पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून गेले आहे. कंपनीमध्ये हंगामी कामगारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे या कामगारांना काम जास्त आणि पगार कमी अशी अवस्था आहे. या कामगारांना साधारणपणे आठ ते पंधरा हजार रुपयांच्या आसपास पगार आहे.

त्यात मुला-मुलींची शिक्षणे, अचानक येणाऱ्या अडचणी, दवाखान्याचा खर्च, तसेच महिन्याचा किराणा अशा गोष्टींसाठी तुटपुंज्या पगारात काटकसर करावी लागत आहे. त्यात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी किमान दररोज एक लिटर पेट्रोल म्हटले तरी 3 हजार रुपये एक महिन्याचा खर्च करावा लागत आहे. नोकरीसाठी ग्रामीण भागातून शहरांकडे येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

त्यातच दर महिन्याचा येणारा खर्च म्हणजे वीजबील सातशे ते आठशे रुपये गॅस सिलिंडर, दुकानातील किराणा, भाजीपाला, चार ते पाच हजार रुपये, जागा, घर, फ्लॅट व गाडी अशासाठी कर्ज घेतले असेल तर त्याचे हप्ते अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता तर खाद्यतेलाच्या भावातही भरमसाठ वाढ झाली आहे. एक लिटर खाद्यतेल पुडा दीडशे रुपयांना मिळत आहे.

शेतमालाला बाजारभाव असेल तर तेजीचे वातावरण असते; परंतु गेल्या मार्च महिन्यापासून करोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना नफा तर सोडाच; परंतु उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे. घेतलेले पीककर्जाची रक्‍कम मार्चमध्ये भरावयाची कशी, घरखर्च, मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च याबरोबरच शेतीसाठी भांडवल आणायचे कोठून, या विवंचनेत शेतकरी आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.