मुंबई – मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी म्हणजेच, अभिनेत्री जेनेलिया यांच्या ‘वेड’ चित्रपटातने सध्या तरी सर्वांनाच वेड लावल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत असून, फॅन्सला देखील ही जोडी आवडली आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडला असून, रितेश आणि जेनेलिया यांना डोक्यावर घेतलं आहे.
दरम्यान, त्यांच्या या चित्रपटाने आता बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याला देखील चांगलीच भुरळ घातली आहे. अभिषेकने नुकतंच एक पोस्ट लिहित रितेश-जिनिलीयाचं कौतुक केलं आहे. ‘वेड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात या 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
अभिषेकने त्याच्या सोशल मीडियावर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले असून, यामध्ये तो म्हणतो… ‘हे जबरदस्त आहे. रितेश-जिनिलीया, तुम्ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तुम्हाला मिळत असलेल्या यशाबद्दल मी खूप आनंदी आहे.’ अभिषेकने शेअर केलेली ही स्टोरी जिनिलीयानेही रिपोस्ट केली आणि त्याचे आभार मानले.
तिने लिहिलं, ‘तुझे मनापासून आभार अभिषेक. सुरुवातीपासूनच तू माझ्या आणि रितेशच्या पाठी उभा होतास. मी हे असंच म्हणत नाहीये, आपलं याबद्दल आधी बोलणं झालं आहे’. असं जिनिलीयाने म्हंटलं आहे. सध्या सिनेमागृहात रितेश-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट सर्वांनाच वेड लावत आहे. आगामी आठवड्यात देखील हा चित्रपट जोरदार कमाई करणार असल्याचं दिसून येत आहे.