– हेमचंद्र फडके
देशात गेल्या चार दशकांपासून लोकसभेसाठीच्या जागांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे काही राज्यांना नुकसान होत आहे. खासदारांची संख्या स्थिर झाली आहे तेव्हापासून लोकसंख्या मात्र तुफान वाढली आहे. परिणामी, राजनैतिक संतुलन बिघडले आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये मतांचे मूल्य असमान बनले आहे. आजघडीला जगभरात भारतातील खासदार हे सर्वाधिक लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. लोकसभा क्षेत्रात भलीमोठी लोकसंख्या असल्यामुळे लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यालाही मर्यादा येत आहेत. तसेच प्रत्येक भागातील लोकांपर्यंत पोहोचणेही त्यांना कठीण होत आहे. त्यामुळेच लोकसभा मतदारसंघातील लोकसंख्या कमी असावी, त्यासाठी नवे मतदारसंघ तयार करावेत म्हणजेच मतदारसंघांची पुनर्रचना करावी, अशी मागणी अलीकडील काळात सातत्याने होताना दिसत आहे.
आजघडीला 1951-52 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत खासदार हे चौपट लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत आहेत. 1951 मध्ये साधारणतः 5 लाख मतदार एका खासदाराची निवड करत होते. ही संख्या आता 20 लाखांवर पोहोचली आहे. दुसरीकडे छोटी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील खासदार कमी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. मात्र छोट्यातील छोट्या राज्यांतूनही लोकसभेचा एक खासदार निवडून आलाच पाहिजे, ही परंपरा आपण पाळत आलो आहोत. त्यामुळे तेथे लोकसंख्या कमी असली तरी परंपरेचा भाग म्हणून ते गरजेचे आहे. 1971 च्या जनगणनेच्या आधारे मोठ्या राज्यांमध्ये 10 ते 10.6 लाख लोकसंख्या असणाऱ्या भागासाठी एक लोकसभेची जागा निर्धारित करण्यात आली. मात्र, तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये बराच फरक पडला आहे. 2016 मधील सर्वेक्षणाचा आधार घेतला तर राजस्थान या राज्यात एक खासदार 30 लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो, तर केरळमधील एक खासदार 18 लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. 1951, 1961, 1971 मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारे लोकसभेच्या जागांची निश्चिती करण्यात आली. तथापि, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये लोकसंख्यावाढीचा वेग कमी असल्यामुळे हिंदी भाषिक पट्ट्यांतील राज्यांमधील लोकसभेच्या जागा वाढल्या. परिणामी, दक्षिणेकडील राज्यांची राजकीय ताकद कमी होत गेली. संविधानातील मूळ तरतुदी आजच्या परिस्थितीत जशाच्या तशा लागू करायच्या झाल्यास आताचे लोकसभेचे स्वरूप पूर्णपणाने बदलून जाईल. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या हिंदी भाषिक राज्यांमध्ये 27 जागांची वाढ होईल. दुसरीकडे दक्षिणेकडील तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यातील 22 जागा कमी होतील.
आज जगभरातील उदाहरणे पाहिल्यास भारतात प्रति खासदार असणारे लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. आपल्याकडील लोकसभेचे खासदार 15 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतात. जगाच्या पाठीवरील देशांची याबाबतची सरासरी पाहिल्यास 1,45,880 इतकी लोकसंख्या आहे. युरोप, आफ्रिकेमध्ये तर 1 लाख लोकसंख्येमधूून 1 खासदार निवडला जातो. आशिया प्रशांत क्षेत्रात हे प्रमाण 3.13 लाख आहे; तर अमेरिकेत 1.56 लाख आहे. अरब देशांत 67 हजार लोकांमधून एक खासदार निवडला जातो, तर युरोपात हा आकडा 63 हजार इतका आहे. भारतात उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात 21.9 लाख मतदार आहेत; तर बंगळुरू उत्तरमध्ये हा आकडा 24 लाख इतका आहे.