वाळ्यापासून बनलेल्या टोप्यांना सातारकरांची पसंती
गुरूनाथ जाधव
सातारा –सध्या कडक उन्हाळा सुरू झाला असून साताराचा पारा देखील वाढला आहे. अनेकांना कामांनिमित्त भर उन्हात बाहेर पडावे लागते. त्यामुळे कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी वाळ्याच्या टोप्यांची खरेदी करताना सातारकर नागरिक दिसत आहे. तप्त ऊन्हामध्ये शरीराला शीतलता मिळावी, यासाठी वाळ्याच्या टोप्या तसेच चपलांची साताराच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते.
सध्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उकाडा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचा बहुतांशी कामे सकाळच्या सत्रातच करून घेण्याकडे कला आहे. तथापि, अनेकदा भर दुपारी उन्हाचा तडाखा सहन करत घराबाहेर पडावेच लागते. त्यामुळे टोप्यांना मागणी वाढली आहे. यामध्ये वाळ्याच्या टोप्यांना मोठी मागणी वाढू लागली आहे. या टोप्या 175 ते 500 रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. शिवाय वाळ्यांच्या चपला व इतर वाळ्याच्या वस्तू देखील शहराच्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. वाळ्यांच्या टोप्या खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. लहान मुलांसोबतच, महिला पुरूष, युवक देखील या टोप्या कडक ऊन्हापासुन संरक्षण मिळण्यासाठी घालत आहेत. या टोप्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ऊन्हात बाहेर जाताना पाण्याचा शिडकावा करून टोपी घातल्यानंतर डोक्याला तसेच डोळ्यांना आराम मिळतो. शिवाय वाळ्याची टोपी आरोग्यदायी असून त्याच्या वापरामुळे उष्णतेचा त्रास अजिबात होत नाही.
दैंनंदिन पिण्याच्या पाण्यामध्ये वाळ्याची पेंडी टाकून पाणी पिल्यास पचन शक्ती वाढून शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते, अशी माहिती सांरग माजगावकर टोपी विक्रेते यांनी दिली आहे. वाळ्याच्या टोप्यामध्ये ब्रिटीश टोपी, लेडिज टोपी, गोल टोपी, रेग्युलर टोपी, सोलर टोपी असे प्रकार आहेत. सोलर टोपीच्या वरच्या भागात सोलर प्लेट बसवण्यात आली आहे. टोपी घालून उन्हात चालताना सौरऊर्जा खेचून पुढील बाजूस असणारा पंखा फिरत राहतो. त्यामुळे कपाळावर आणि चेहऱ्यावर थंडावा निर्माण होतो. या टोपीलादेखील मोठ्या प्रमाणात नागरिकांची मागणी आहे.
उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना जीव जुंतूना वातावरणीय बदलाला सामोरे जाताना त्यांचे दैनंदिन जीवनमान कोलमडून पडते. मात्र एकमेव मनुष्यप्राणी प्रत्येक वातावरणीय बदलात स्वत:च्या कौशल्याने मात करत त्या वातावरणात स्वत:ला ऍडजस्ट करताना दिसतो. त्यामुळे उन्हाळा आला आरोग्य सांभाळा म्हणताना शितपेय, रस, कलिंगड, लस्सी असे अन्न पदार्थासोबतच शरीराची काळजी घेण्यासाठी कायमच टोपी, गॉगल, सनकोट रूमाल यांचा वापर केल्यास उन्हाची शरीराला भासणारी तीव्रता कमी होण्यास मदतच होईल.