नगर, (प्रतिनिधी) – नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपूला खाली सोमवारी रात्री गंभीर दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणाला दुखापत अथवा जीवित हानी झाली नाही. मात्र अचानक उड्डाणपुलाचा एक हिस्सा कोसळल्यामुळे खालून जाणाऱ्या चार चाकी वाहनाची काच फुटली.
घटना समजतात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुर्घटनाग्रस्त गाडी चालकाला मदत केली. उड्डाणपुलाचे श्रेय घेणाऱ्या खासदार, आमदारांनी या निकृष्ट कामाचे देखील श्रेय घ्यावे, अशी टीका शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.
यावेळी काळे यांच्या समवेत काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत उजागरे, विलास उबाळे, अनिस चुडीवाला, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे, बाबासाहेब वैरागर आदी उपस्थित होते. उड्डाणपुलाचा मालबा अचानक कोसळला. त्यावेळी एक दुचाकी स्वार मागून येत होता. त्याने गाडी डावीकडे घातली. तो देखील अपघात होता होता बचावला.
त्या ठिकाणी जवळच असणारे शहर अल्पसंख्यांक काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत उजागरे हे तात्काळ त्यांच्या मदतीला धावून गेले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ही घटना अत्यंत गंभीर आहे. सुदैवाने अपघातग्रस्ताचे प्राण वाचले आहेत. एखादा दुचाकीस्वार त्या ठिकाणी असता तर त्याचा जीव त्या ठिकाणी गेला असता. अशा पद्धतीने निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.