दीड दिवसांच्या गणपतीचे आज विसर्जन

मूर्ती हौदात विसर्जन करण्याचे महापालिकेचे आवाहन

पुणे – दीड दिवसाच्या गणपतीचे मंगळवारी विसर्जन होणार असून, या मूर्ती महापालिकेने नदीकाठावर बांधलेल्या हौदात करावे, असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी केले आहे.

दीड दिवसांच्या गणपतीचे मंगळवारी दुपार नंतर विसर्जन होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तींचे विसर्जन नदीत न करता ते हौदात करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय नागरिकांनी सोबत आणलेले निर्माल्य हे खास त्यासाठी ठेवलेल्या कलशातच टाकावे, अशाही सूचना महापालिकेतर्फे करण्यात आल्या आहेत. महापालिकेतर्फे नदीकाठावर सुमारे 30 निर्माल्य कलश आणि 40 कंटेनर ठेवण्यात आले आहेत.

याशिवाय घरातल्या घरात बादलीत मूर्ती विसर्जित करण्याला प्राधान्य द्यावे, अमोनियम बाय कार्बोनेटच्या द्रावणात मूर्ती विसर्जित कराव्यात, असेही महापालिकेचे आवाहन आहे. ही पावडर महापालिकेतर्फे मोफत उपलब्ध असून, आपापल्या भागातील क्षेत्रीय कार्यालये आणि आरोग्य कोठींमध्ये मिळेल, असेही महापालिकेतर्फे कळवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.