दिल्लीचा दिवा पाहण्यासाठी तयारीला लागा

म्हसवड – माण-खटावच्या जनतेने मनात जे ठरवलंय ते होणारच आहे आणि माझ्या मायभूमीची जागा मीच घेणार आहे. उपस्थित धनगर, नाईक, मातंग व लोणारी आदी बहुजन समाजाने एकत्र येवून पिढ्यान्‌पिढ्या वंचित राहिलेल्या माण खटाव तालुक्‍यात कायम पाणी येण्यासाठी, युवकांच्या हाताला काम देण्यासाठी, उच्च व दर्जेदार शिक्षण, आरोग्य व रस्ते आदी कामे करण्यासाठी आपल्या मनातील माणसाला मदत करा, भाजपाकडून निधी आणण्याचे काम माझे आहे, तुम्हाला दिल्लीचा दिवा पाहण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर यांनी केले.

राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री व दुष्काळी माणदेशातील पहिले मंत्री ना. महादेवराव जानकर यांनी पुरंदर तालुक्‍यातील भिवडी येथे सर्व प्रथम आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करुन शासकीय उत्सवाचे रुप मिळवून दिल्याबद्दल व खटावचे सुपुत्र उत्तम बंडु तुपे यांनी केलेल्या लिखानातून अनेक कांदबरी प्रसिद्ध होऊन त्यांच्या कांदबरीवर अनेक चित्रपट तयार झाले असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व प्रसिध्दपासून दूर होते. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा म्हणून शासन दरबारी शिफारस केल्याबद्दल मंत्री महादेवराव जानकर यांचा नाईक व मातंग समाज्याच्या वतीने म्हसवड येथे नागरी सत्काराचे आयोजन शुगर ग्रीड पिंगळी, हरणाई सूतगिरणी, माणदेशी सूतगिरणी, फिनिक्‍स ऑर्गनायझेशनचे रणजितसिंह देशमुख यांनी केले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आ. प्रभाकर घार्गे, जिल्हा बॅंकेचे सदस्य अनिल देसाई, प्रभाकर देशमुख, नगराध्यक्ष तुषार विरकर, भास्कर गुंडगे, डॉ. संदीप पोळ, प्रा. विश्‍वंभर बाबर, संदीप मांडवे, किशोर सोनवणे, बाळासाहेब खाडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव भोसले, मामूशेठ विरकर, बबनशेठ विरकर, विलासराव माने, प्रा. कविता म्हेत्रे, सीमा बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते मंत्री महादेवराव जानकर म्हणाले, पुढील 15 ऑगस्टपर्यंत माण- खटाव तालुक्‍यात कायमस्वरूपी पाणी योजना आणुन दोन्ही तालुके हिरवेगार करणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडुन दोन्ही तालुक्‍यात चारपदरी रस्ते, रेल्वे मार्ग, एमआयडीसी आदी कामे भाजपाच्या माध्यमातून करणार आहे.

रणजितसिंह देशमुख म्हणाले, माण- खटावच्या जनतेला पाण्यासाठी झुलवत ठेवण्याचे पाप दहा वर्षात केले. युवकांच्या हाताला काम देण्यापेक्षा पोलिस ठाण्याच्या वाऱ्या करायला लावल्या. यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, डॉ. संदीप पोळ, कविता म्हेत्रे, सुनिल नेटके यांची भाषणे झाली. सूत्रसंचलन सचिन होनमाने यांनी केले तर आभार ऍड. विलास चव्हाण यांनी मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.