आले रे…आले रे… गणपती आले

सातारा  – गेल्या काही दिवसांपासून आतुरता लागून राहिलेल्या बाप्पांचे अखेर सोमवारी मोठ्या धुमधडाक्‍यात आणि उत्साही वातावरणात आगमन झाले. ढोल, ताशांचा गजर आणि “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने अवघा जिल्हा दुमदुमुन निघाला. शहरांसह ग्रामीण भागातील मंडळांनी मिरवणुका काढून बाप्पांचे स्वागत करत प्रतिष्ठापना केली. बाप्पांच्या आगमनाने अवघ्या जिल्ह्यातील वातावरण भक्तीमय झाले आहे.

सोमवारी गणेश चतुर्थीदिवशी सकाळपासून बाप्पांना घरी घेऊन येण्यासाठी अगदी लहानांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांची लगबग पहावयास मिळत होती. विशेष म्हणजे नेहमी खरेदीसाठी गजबजणाऱ्या शहरांप्रमाणे ग्रामीण भागात कुंभारवाड्यांमध्ये गणेशमूर्तींच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत होती. महाराष्ट्राचा महाउत्सव असलेल्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. पहाटेपासूनच बाप्पाला घेऊन जाण्यासाठी मूर्तीशाळांमध्ये रांगा लागल्या होत्या. जिकडे-तिकडे पारंपरिक वेषातील अनवाणी पावलांची लगबग दिसत होती. नातवंडांसोबत आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

बाप्पाची मूर्ती हातात येताच “मोरया’चा गजर टीपेला पोहोचत होता. कुणी पाटावरून, कुणी डोक्‍यावरून, कुणी दुचाकीवर, कुणी रिक्षाने तर कुणी स्वत:च्या खासगी वाहनांनी बाप्पांना घरी नेत असल्याचे दृश्‍य दिवसभर पहावयास मिळत होते. प्राणप्रतिष्ठेसाठी गुरुजींची धावपळ सुरू होती. काही छोट्या सार्वजनिक मंडळांनीही आज बाप्पाची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे गल्लोगल्ली जल्लोष पाहायला मिळत होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.