मुंबई : करोना साथीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)च्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण महिलांना समृद्ध व आत्मसन्मानाचे तसेच सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती होण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे.
याचाच भाग म्हणून विविध योजनांमध्ये कृतीसंगमाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.