दुसऱ्यावर खापर फोडल्यानेच विराट कोहली अडचणीत

मुंबई – बीसीसीआयशी ताणले गेलेले संबंधच विराट कोहलीला भोवले. सातत्याने आपल्या मर्जीतील खेळाडूंसाठी लावलेली फिल्डिंग व संघातील अन्य सहकारी खेळाडूंवर पराभवानंतर खापर फोडण्याची मानसिकता यांमुळेच अखेर कोहलीला टी-20 संघाचे नेतृत्व सोडावे लागले, अशी माहिती संघातील एका वरिष्ठ खेळाडूने दिली आहे.

भारतीय संघात शिखर धवनला संधी देण्यासाठी कोहली सातत्याने आग्रही असायचा तसेच अनेक काही खेळाडूंबाबतही त्याने अनेकदा हट्ट धरला होता. अनेकदा तर निवड समितीच्या सदस्यांशी त्याने वादही घातला होता. संघात बदल करण्याचे धोरण तसेच आपल्या मर्जीतील खेळाडूंनी सातत्याने संधी देणे व त्यांच्या सुमार कामगिरीनंतरही त्यांना संघात स्थान देण्यासाठी आग्रही राहणे यांमुळेच कोहलीबाबत निवड समितीचे मत वाइट बनले. त्याला थेट तिनही संघांच्या कर्णधारपदावरून डच्चू देणे इतक्‍यात शक्‍य नसल्याने सध्या केवळ टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून बाजूला करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला गेला, असेही या खेळाडूने सांगितले.

जागतिक कसोटी अजिंक्‍यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने संघातील सहकारी खेळाडूंमध्ये जिंकण्याची जिद्दच नव्हती तसेच त्यांना हा सामना खेळण्यासाठी लागणारी मानसिकताही नव्हती, असे विधान केले होते. त्यामुळेच संघातील एका वरिष्ठ खेळाडूने तक्रार केली होती व त्यानंतर कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील संबंध बिघडले.

भारतीय संघातील काही खेळाडूंमध्ये जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळाडूंमध्ये तो जिंकण्यासाठीचा हेतू आणि आत्मा नव्हता, असे वक्‍तव्य केले होते. त्यावरून दुखावलेल्या एका वरिष्ठ खेळाडूने कोहलीची तक्रार थेट बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे केली होती. अनेक खेळाडू कोहलीच्या या दृष्टिकोनावर नाराज झाले. कोहली आपले मानसिक संतुलन गमावत आहे. त्याने आपला आदर गमावला आहे आणि काही खेळाडूंना त्याचे वर्तन पसंत नाही. तो आता प्रेरणादायी राहिलेला नाही आणि खेळाडू त्याला योग्य तो सन्मान देत नाहीत, असेही या खेळाडूने शहा यांना सांगितले होते.

सेफ गेम

रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवावे, अशी सूचना कोहलीने केली होती. आगामी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा कोहलीने केली. या पार्श्‍वभूमीवर टी-20 संघाचे कर्णधारपद रोहितकडे जाण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे 34 वर्षीय रोहितवरील दडपण कमी करण्यासाठी एकदिवसीय संघाचे उपकर्णधारपद लोकेश राहुलकडे सोपवावे आणि टी-20 संघाचे ऋषभ पंतकडे देण्यात यावे, अशा सूचनाही त्याने निवड समितीला केल्याचे समजते. मात्र, एकदिवसीय संघाचे कर्णधारपद 2023 सालापर्यंत सुरक्षित राहावे, याकरिता आपला उत्तराधिकारी नसावा, याच हेतूने त्याने हा प्रस्ताव दिल्याचेही या खेळाडूने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.