पुणे (सचिन खोत) – दिव्यांग वधू वर मेळावे घेण्यासाठी राज्यात विभागनिहाय नियोजन करा. त्यासाठी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पुणे येथे मार्केट यार्ड येथे शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा अपंग हक्क विकास मंच मुंबई व महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या सहकार्याने दिव्यांग वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.
खासदार सुळे म्हणाल्या की, करोना काळात या मेळाव्याचे आयोजन केले होते. परंतु संसर्ग वाढल्याने मेळावा पुढे ढकलण्यात आला. राज्यभरातून दिव्यांग तरुण आणि तरुणी आल्या आहेत. यानंतर विभागनिहाय मेळावे घेण्यासाठी नियोजन करा. त्यामुळे त्या त्या भागात सोयीस्कर होईल. मुंबईमध्येही वधू वर मेळाव्याचे नियोजन करा. मेळाव्यातील जुळलेले विवाह 12 डिसेंबर रोजी मोफत करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कोविड काळात दिव्यांगाना लसीकरण सुरु आहे. 100 टक्के लसीकरण कसे पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कोणीही दिव्यांग वंचित राहणार नाही, यासाठी लक्ष दिले जाईल. हा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविल्याबद्ल पदाधिकारी यांचे कौतुक केले. यावेळी मेळाव्यास राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. मुंबई, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, विदर्भातून तरुण तरुणींनी सहभाग घेतला होता.
यावेळी 20 वधू वरांचा परिचय समाधानकारक झाला आहे. तसेच 8 विवाह जुळले आहेत. कार्यक्रमाचे संयोजक विजय कान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार फुले, भाग्यश्री मोरे, निमिता पाटील, अशोक सोळंके, अभय पवार, दत्तात्रय भोसले, अमेय अग्रवाल, दीपिका शेरखान, सुकेशनी मर्चंडे, विष्णू वैरागड यांनी यशस्वी नियोजन केले.