शरद पवारांना भेटण्यासाठी ‘व्हीआयपी’ जनतेबरोबर रांगेत

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार तसेच सुप्रिया सुळे यांना दिवाळीच्या पाडव्यानिमित्त भेटण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी बारामती येथील शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी हजेरी लावली. सकाळी सहा वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली. शरद पवार साहेब व पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बाग समोर तब्बल दोन किलोमीटरची रांगा लागल्याची चित्र होते.

दरम्यान, दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आलेले ‘व्हीआयपी’ देखील सर्वसामान्य जनतेबरोबर रांगेत उभा होते. त्यामध्ये आमदार धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड,दत्तात्रय भरणे,आमदार सुनील टींगरे,सुनील तटकरे,सुनील शेळके आदी बड्या नेत्यांचा समावेश होता. वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य बारामती शहरात खबरदारी घेतली होती.

राजकीय कामकाजानिमित्त वर्षभर राज्यात कुठेही असले तरी दिवाळीच्या निमित्ताने पवार कुटुंबियातील सर्व सदस्य किमान चार ते पाच दिवस बारामती येथे एकत्र येतात. पाडव्याच्या दिवशी बारामतीकरांसह राज्यातील हजारों कार्यकर्ते शरद पवार तसेच अजित पवार व सुप्रिया सुळे यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी येतात. राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांना शरद पवार स्वतः भेटतात त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात.


विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे कुठे आहेत त्याची कल्पना कोणाला नव्हती राज्यात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य मिळवून देखील अजित पवार जनतेसमोर का येत नाहीत याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गोविंद बाग येथे अजित पवार उपस्थित राहिले त्यांनी बारामतीकरांची राज्यातील जनतेच्या यावेळी शुभेच्छा स्वीकारल्या. असे असले तरी ते 72 तास अजित पवार नेमकी कुठे होते ते जनतेसमोर का आले नाहीत याची कुजबुज देखील सुरु झाली.


ऐंशीव्या वर्षात देखील तरुणांना लाजवेल असा उत्साह शरद पवार यांच्यात भरला आहे . विधानसभा निवडणुकीत हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तीच प्रेरणा घेत आंबेगाव येथील दोन तरुणांनी पुणे ते बारामती पायी प्रवास करत शरद पवार यांना भेटून दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. विशाल सोळस्‍कर व रवींद्र सोळस्‍कर अशी या दोन दोघांची नावं आहेत. या वयातही पवार साहेबांनी तरुणांपुढे आदर्श निर्माण केल्यानेच आपण 100 किलोमीटर पायी प्रवास करत त्यांना भेटण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.