पुणे महामेट्रोकडून पालिकेच्या ‘डीसी रुल’चा भंग?

शिवसेनेचा आरोप : महापालिका आयुक्‍तांना निवेदन

पुणे – महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गाच्या कामात “महामेट्रो’ने अनेक ठिकाणी महापालिकेच्या विकास नियमावलीचा भंग केल्याचा आरोप शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला आहे.

त्यामुळे या संदर्भात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करावी, अशी मागणी सुतार यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

“या कामादरम्यान मेट्रोने अनेक ठिकाणी चुकीचे बांधकाम केले आहे. याचा परिणाम पालिकेच्या विकास आराखड्यावर होत आहे. यामध्ये विकास आराखड्यात दर्शवलेल्या रस्त्यांची प्रस्तावित रुंदी आणि त्यावर केलेले मेट्रोच्या थांब्यांचे बांधकाम यामध्ये तफावत आढळत आहे. नदी पात्रातील रेड लाइन आणि ब्लू लाइनचा विचार न करता मेट्रोने बांधकाम केले आहे,’ असे सुतार यांचे म्हणणे आहे.

तसेच टीडीआर झोनमधील बांधकाम आणि 18 मीटर रुंदीचे रस्ते आणि त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवरील मेट्रोचे बांधकाम अशा चुकीच्या बांधकामांचा परिणाम शहराच्या विकास आराखड्यावर होत आहे.

यामुळे नागरिकांना भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. शहरात बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. सर्वसामान्यांना बांधकामाबाबत जसे कडक नियम आहेत, ते महामेट्रोला का लावत नाही? असा सवाल सुतार यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे मेट्रोचे अधिकारी, शहर अभियंता तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी आणि मेट्रोने आता पर्यंत केलेल्या कामाची सादरीकरण करावे, अशी मागणी सुतार यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.