पुणे – बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या फिडे क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीअखेर आयएम विक्रमादित्य कुलकर्णी, पुण्याचा आदित्य सामंत, एफएम सौरव खेर्डेकर, अनदकत कर्तव्या या चार खेळाडूंनी 5 गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली आहे.
अश्वमेध हॉल, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पाचव्या फेरीत रेल्वेच्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णीने गुजरातच्या करण त्रिवेदीचा पराभव करून 5 गुण मिळवले. तर फिडे मास्टर आदित्य सामंतने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत अक्षय बोरगावकरचा पराभव करत 5 गुणांची कमाई केली.
नागपूरच्या फिडे मास्टर सौरव खेर्डेकरने अनुप धोंडला पराभूत करून 5 गुण मिळवले. गुजरातच्या अनदकत कर्तव्याने आपला राज्य सहकारी विवान शहाचा पराभव केला.