नवी दिल्ली – कॉंग्रेसने मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये संघटनात्मक पातळीवर व्यापक फेरबदल केले. त्यानुसार, विकार रसूल वानी यांना प्रदेशाध्यक्ष, तर रमन भल्ला यांना कार्याध्यक्ष बनवण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. संघटनात्मक पातळीवरील फेरबदलांमुळे आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेस सज्ज झाल्याचे मानले जात आहे.
कॉंग्रेसकडून विविध समित्यांचीही स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आले आहे. नवे प्रदेशाध्यक्ष वानी हे आझाद यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आझाद यांचे कॉंग्रेसमधील महत्व कायम असल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले.
कॉंग्रेसच्या असंतुष्ट मानल्या जाणाऱ्या 23 ज्येष्ठ नेत्यांच्या गटाचा आझाद भाग होते. मात्र, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा आझाद यांच्यावरील विश्वास अबाधित असल्याचेही सूचित झाले. कॉंग्रेसच्या समित्यांमध्ये इतर ज्येष्ठ नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे जुन्याजाणत्या आणि तरूण नेत्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाने केल्याचे दिसते.