लंडन – भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजाराने येथे सुरू असलेल्या काउंटी एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात आक्रमक शतक फटकावले. केवळ कसोटी फलंदाज असा शिक्का बसलेल्या पुजाराच्या या खेळीमुळे आता निवड समितीच्या विचारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इंग्लंडच्या रॉयल वन डे करंडक स्पर्धेत त्याने सलग दुसरे शतक फटकावले. ससेक्सकडून खेळताना त्याने सरेविरुद्ध 131 चेंडूत 174 धावा केल्या. या खेळीत त्याने 20 चौकार आणि 2 षटकार फटकावले. पुजाराने वयाच्या 34 व्या वर्षी 50 षटकांच्या सामन्यांत कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी केली आहे.
पुजाराच्या या खेळीमुळे ससेक्सने 50 षटकांत 6 गडी गमावून 378 धावा केल्या. पुजारासह टॉम क्लार्कने 104 धावांची खेळी केली. पुजारा ससेक्सचा कर्णधारही आहे. याआधी त्याने वॉर्विकशायरविरुद्ध 107 धावांची खेळी करत आक्रमक शतक साकार केले होते.
पुजारावर त्याच्या संथ फलंदाजीसाठी अनेकदा टीका केली जाते. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये जास्त संधी मिळाल्या नाहीत. पुजाराला भारताकडून एकाही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी मिळाली नाही. तसेच त्याने कारकिर्दीत केवळ 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत.