पुणे – भीमा कोरेगाव येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून विजयस्तंभास मानवंदना दिली. विजयस्तंभ परिसर विकासासाठी शासनाने घोषित केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीची अंमलबजावणी करणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
पाटील म्हणाले की, एक जानेवारीला युद्धात प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला विजयस्तंभ उभारण्यात आला. बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी1 जानेवारी 1927 रोजी आपल्या अनुयायांसह भीमा कोरेगाव येथे शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना दिली होती. तेव्हापासून लाखो अनुयायी दरवर्षी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माझ्या मनात प्रचंड श्रद्धा आहे. तिचे जाहीर प्रदर्शन करणे हा माझा स्वभाव नाही.
सन 1982 साली काढलेल्या समता यात्रेचे नेतृत्व मी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, यासाठी शेकडो गावांमध्ये केलेल्या संवाद यात्रेचे नेतृत्वही मी केले. मात्र, मी दोन वेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करून माझ्यावर शाई फेकण्याचा भ्याड हल्ला झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणणाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवली. आताही मी कोरेगाव भीमाला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलो तर पुन्हा शाई फेकू, अशी धमकी आली.