video: अरे देवा! चालकाचा इंजिनवरील ताबा सुटला अन् संपूर्ण ट्रेन उलट दिशेने धावली

उत्तराखंडमधील आठवडाभरात दुसरा धक्कादायक प्रकार; सर्व प्रवासी सुखरूप

देहरादून : उत्तराखंडमध्ये बुधवारी एक मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. नवी दिल्ली येथून टनकपूर येथे जाणारी पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस अचानक रेल्वे रुळांवरून उलट्या दिशेने धावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ती थांबवण्यात यश आले आहे. उत्तराखंड येथे काहीच दिवसांपूर्वी दिल्लीहून देहरादूनला येणाऱ्या जनशताब्दीला आग लागल्याची घटना समोर आली होती. त्यातच ही दुसरी घटना घडल्यामुळे रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेस टनकपुर स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी विरुद्ध दिशेने धावली. त्यानंतर ट्रेनच्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ माजला. तसेच, रेल्वे विभागातही खळबळ माजली. रेल्वेने घाईघाईत अलर्ट जारी करत टनकपूर ते खटिमापर्यंतचे फाटक बंद केले. ट्रेन टनकपूर ते चकरपूरपर्यंत विरुद्ध दिशेत वेगाने अनेक किलोमीटरपर्यंत धावली. प्रवासी आणि ट्रेनला कुठल्याच प्रकारचे काही नुकसान पोहोचले नाही.

सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. तर, या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली नॉर्दन रेल्वेने लोकोपायलट आणि गार्डला निलंबित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी जवळपास चारवाजेच्या सुमारास होम सिग्नलजवळ एक प्राणी ट्रेनखाली येत असल्याचे दिसताच चालकाने जोरात ब्रेक दाबला. त्यानंतर ट्रेन थांबली आणि ट्रेनचे इंजिन आणि ब्रेकने काम करणे थांबवले आणि ट्रेन विरुद्ध दिशेने धावली.

बनबसामध्ये दगड लावून ट्रेनला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ट्रेन थांबली नाही. इज्जतनगर मंडळचे पीआरओ राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, घटनेच्या तपासासाठी तीन ए-ग्रेड ऑफिसर्सची टीम स्थापन करण्यात आली आहे. तपासात घटनेतील दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. गेल्या महिन्यात 26 फेब्रुवारीपासून पूर्णागिरी जनशताब्दी एक्स्प्रेस सुरु झाली होती. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी व्हर्च्युअल माध्यमातून टनकपूर स्टेशनवरुन या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.