मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतचं ‘खुपते तिथे गुप्ते’ या मराठी शोमध्ये हजेरी लावत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. यादरम्यान राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले. संजय राऊत यांना खासदार मी केलं नाहीतर झाला नसता असा खुलासा नारायण राणे यांनी यावेळी केला आहे. यावेळी राणे यांनीं थेट ठाकरेंना फोन लावल्याचे देखील पाहायला मिळते.
यापूर्वी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे अभिनेता श्रेयस तळपदे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. आता थेट केंदीय मंत्री नारायण राणे यांनी या शोमध्ये येत दिलखुलासपणे प्रश्नाची उत्तरे दिल्याचे समजते. येत्या 18 जून रोजी या शोचा भाग प्रसारित होणार आहे.
खुपते तिथे गुप्ते या अवधूत गुप्ते यांच्या शोमध्ये नारायण राणे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केल्याचे समजते. याचा एक प्रोमो देखील समोर आला आहे. यावेळी राणेंना संजय राऊत यांची एक व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली. “नारायण राणे फक्त पोपटासारखे बोलत असतात, आता फक्त एवढंच सांगायचं बाकी आहे, की बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना प्रमुख म्हणून मी नेमलं” असं राऊत या क्लीपमध्ये बोलताना दिसतात.
यावर नारायण राणे उत्तर देतात,”याला खासदार मी केलं.. तेव्हा खासदार झाला नसता तर पुढे देखील कधीच खासदार दिसला नसता. हे माझं पाप आहे” मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा कुटुंबासह घर सोडल्याचा दावा देखील यावेळी राणेंनी केल्याचे समजते. तसेच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राणे हे फोन घेऊन उद्धव ठाकरेंना फोन लावताना देखील दिसले आहेत.
View this post on Instagram
जय महाराष्ट्र उद्धवजी असं यावेळी राणे फोनवर बोलताना दिसतात. अर्थात हा काल्पनिक कॉल आहे. खुपते तिथं गुप्ते या शोमध्ये आलेल्या पाहुण्यांना हव्या त्या व्यक्तीला कॉल करून हवे ते बोलण्यास सांगितले जाते. त्यातील एक सेगमेंटमध्ये नारायण राणे थेट फोन उचलून ठाकरेंच्या नावाने बोलताना दिसतात. अर्थात ते फोनवर काय बोलले हे रविवारी १८ जुन रोजी पूर्ण भागात पाहता येणार आहे.