मुंबई – बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. सिनेसृष्टीपासून काहीशा दूर असल्या तरी हेमा मालिनी यांची फॅन फॉलोविंग कमी झालेली नाही. याचाच प्रत्येय नुकताच पाहायला मिळाला. झालं असं हेमा मालिनी यांनी आपली आलिशान कार सोडून थेट मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी सर्वसामान्यांशी तर सवांद साधलाच शिवाय यावेळी त्या अगदी साधेपणाने वावरताना दिसल्या.
हेमा मालिनी सध्या मथुरेच्या खासदार आहेत. मेट्रोतील प्रवासाबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी स्वतः आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. जो काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यावेळी हेमा मालिनी यांनी स्वतः डीएन नगर मेट्रो स्टेशनवर जाऊन प्रवासासाठी मेट्रो पकडली. यावेळी त्यांच्याभोवती चाहत्यांची अक्षरशः गर्दी जमा झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी हेमा मालिनी यांनी लेडीज डब्यात प्रवासाला पसंती दिली. मेट्रोमध्ये ड्रीम गर्लची एंट्री होताच तरुणींसह सर्व महिलांनी त्यांना गराडा घातला. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायला सुरुवात केली. बऱ्याचदा सुरक्षा रक्षक असूनही अनेक स्टार्सना अडचणींचा सामना करावा लागत असतो. मात्र हेमा मालिनी यांना महिलांच्या डब्यात कोणतीही अडचण आली नाही. अगदी साधेपणाने त्यांनी सर्वांसोबत संवाद साधला.
View this post on Instagram
प्रवास इतका आरामदायक होता कि माझ्या सुरक्षा रक्षकांना देखील या प्रवासनांतर विश्वास बसेना असं हेमा मालिनी यांनी म्हंटल आहे. हेमा मालिनी यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री तसेच खासदार असूनही अगदी साधेपणाने वावरल्यामुळे अनेकांनी हेमा मालिनी यांचे कौतुक केले आहे.