नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची अखेर दिल्ली पोलिसांनी दखल घेतली आहे. त्यांच्याविरोधात ‘पोक्सो’सह आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आंदोलन करणाऱ्या सर्वच कुस्तीगिरांनी समाधान व्यक्त केले. परंतु, अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याच्या निर्णयावर कुस्तगीर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आज सकाळीच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या जंतरमंतर येथील आंदोलनस्थळी पोहचल्या. प्रियंका गांधींनी विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्याबरोबर या सर्व प्रकरणावर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रियंका गांधींबरोबर काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डाही आंदोलनस्थळी उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुद्धा कुस्तीगिरांची भेट घेणार आहेत.
#WATCH | "I don't have any expectations from the PM, because if he is worried about these wrestlers, then why has he not talked to them or met them yet. Why the govt is trying to save him (Brij Bhushan Sharan Singh…," says Congress leader Priyanka Gandhi Vadra in Delhi pic.twitter.com/XLDpIruQHv
— ANI (@ANI) April 29, 2023
लैंगिक शोषणाबाबतच्या महिला कुस्तीगिरांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करून ब्रिजभूषण यांना अटक करण्याच्या मागणीसाठी देशातील आघाडीचे कुस्तीगीर २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे पुन्हा आंदोलन करत आहेत. त्यांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर दिल्ली पोलिसांना काल ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यासाठी सहा दिवसांचा वेळ लावला. त्यामुळे ते या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करतील याची खात्री नसल्याचे विनेश फोगटने म्हटले आहे. “पोलीस ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात काय कारवाई करतात, ते पाहू. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेऊ. ब्रिजभूषण यांना अटक करावी आणि त्यांना सर्व पदांवरून तातडीने हटवण्यात यावं. तसे न झाल्यास ते चौकशीदरम्यान अडथळा निर्माण करतील,” असेही विनेश फोगाटने सांगितले.