मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या नवनवीन अपडेट्स एकामागून एक समोर येत आहेत. आदिपुरुषमध्ये भगवान राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची कथा दाखवण्यात येणार आहे. याआधी या चित्रपटाची कथा आणि लूक यावरून बराच गदारोळ झाला होता. मात्र यात काही प्रमाणात बदल केले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे आणखी एक मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. आदिपुरुषच्या नवीन मोशन पोस्टरमध्ये सीताच्या भूमिकेत असलेल्या क्रिती सेननच्या भांगेत कुंकू आणि कपाळावर टिकली लावल्याचे पाहायला मिळते.
काही दिवसांपूर्वी आदिपुरुषचा नवीन पोस्टर आऊट झाला होता. यात सीतेच्या भांगेत कुंकू नसल्याने वाद झाला होता. सीतेच्या भूमिकेत असलेल्या क्रिती सेननला विनाकुंकू दाखवून अविवाहीत महिला म्हणून दाखवले होते. हे चित्रपट निर्मात्यांनी हे जाणीवपूर्वक केलं असून त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याची प्रतिक्रिया अनेकांनी केली होती. आदिपुरुषच्या त्या पोस्टरवरुन मुंबई उच्च न्यायालयात तक्रारही दाखल केली होती.
मात्र आता नुकत्याच रिलीज झालेल्या मोशन पोस्टरमध्ये त्यात काही प्रमाणात बदल केल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी अक्षय्य तृतीयानिमित्त दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे नवे आणि खास मोशन पोस्टर शेअर केले होते. या मोशन पोस्टरमध्ये प्रभास भगवान रामाच्या लूकमध्ये धनुष्यबाण घेऊन उभा असल्याचे दिसते.
PRABHAS – KRITI SANON – ‘ADIPURUSH’: NEW POSTERS ARRIVE… On the auspicious occasion of #SitaNavmi, Team #Adipurush launches the #MotionPoster featuring #KritiSanon… Stars #Prabhas… Directed by #OmRaut. pic.twitter.com/QRj0B7SDsf
— taran adarsh (@taran_adarsh) April 29, 2023
दरम्यान, या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला तेव्हा बराच वाद झाला होता. चित्रपटात दाखवण्यात आलेले VFX लोकांना फारसे आवडले नव्हते. त्यानंतर त्याचे प्रदर्शनही काही काळ पुढे ढकलण्यात आले. आता हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात प्रभास रामाच्या आणि क्रिती सेनॉन सीतेच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सैफ अली खान रावणच्या आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.