मुंबई : दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाल्याची माहिती डीडी सह्याद्रीकडून ट्विटरवर देण्यात आली आहे. या बातमीनंतर माध्यम क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन @DDNewslive @DDNewsHindi
#PradipBhide #दूरदर्शन #Doordarshan pic.twitter.com/uHa31I1vnd— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 7, 2022
बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्य़ाद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे त्यांनी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते. 1972 मध्ये दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर 1974 पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती.
प्रदीप भिडे यांचे आई आणि वडील शुभलक्ष्मी व जगन्नाथ हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. विविध ठिकाणच्या शाळांमध्ये बदली होत असल्याने प्रदीप यांचे शिक्षण महाराष्ट्रातील पाच ते सहा खेडेगावांतून झाले होते. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ‘रानडे’मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.