नवी दिल्ली – दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी कोलकाता येथील कंपनीशी संबंधित हवाला व्यवहारासंदर्भात सत्येंद्र कुमार जैन, पूनम जैन, त्यांचे सहकारी आणि अन्य व्यक्तींच्या घरांवर छापे टाकले. यादरम्यान, ईडीला 2.82 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 1.80 किलो वजनाची 133 सोन्याची नाणी सापडली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छाप्यात राम प्रकाश ज्वेलर्समधून 2.23 कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचवेळी जीएस मथारू यांच्याकडून 20 लाख रुपये आणि वैभव जैन यांच्याकडून 133 सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत.
अंकुश जैन, वैभव जैन, नवीन जैन आणि सिद्धार्थ जैन (राम प्रकाश ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक), जीएस मथारू, योगेश कुमार जैन यांच्या ठिकाणांवर ईडीने छापे टाकले होते. छाप्यादरम्यान विविध कागदपत्रे आणि डिजिटल रेकॉर्ड जप्त करण्यात आले. PMLA अंतर्गत 2.82 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 1.80 किलो वजनाची 133 सोन्याची नाणी जप्त करण्यात आली.
‘आप’चा केंद्र सरकारवर हल्लाबोल –
ईडीच्या या छापेमारीनंतर ‘आप’ने केंद्र सरकारला घेराव घालण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, यावेळी पंतप्रधान पूर्ण ताकदीने आम आदमी पार्टीच्या मागे लागले आहेत. विशेषत: दिल्ली आणि पंजाब सरकारच्या मागे लागले आहेत. सुडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. तुमच्याकडे सर्व यंत्रणांचा अधिकार आहे, पण देव आमच्या पाठीशी आहे, असे केजरीवाल म्हणाले. आप नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, रात्री 7 वाजता दाखल झालेले ईडीचे लोक रात्री 2 वाजता निघून गेले. ईडीकडे विशेष माहिती नव्हती. केंद्र सरकारच्या इशार्यावर ईडी अशा पद्धतीने वागत आहे.
सत्येंद्र जैन 9 जूनपर्यंत ईडीच्या कोठडीत –
दरम्यान, आप नेते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर 31 मे रोजी ट्रायल कोर्टाने सत्येंद्र जैन यांना 9 जूनपर्यंत ईडी कोठडीत पाठवले.