लंडन – निती आयोगाच्या माजी कर्मचारी असलेल्या आणि लंडनमध्ये पी.एचडी करत असलेल्या भारतीय विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला आहे. चेष्ठ कोचर असे या ३३ वर्षीय विद्यार्थीनीचे नाव असून त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पी.एचडी करत होत्या.
मूळच्या हरियाणातील गुरुग्राममधील असलेल्या कोचर या गेल्या वर्षी पी.एचडीसाठी लंडनला गेल्या होत्या. त्यांच्या वडिलांनी या घटनेची माहीती ऑनलाईन प्रसिद्ध केल्यानंतर ही घटना उघड झाली.
लंडन पोलिसांकडून अद्याप या अपघाताला जबाबदार असलेल्या व्यक्तीचे नाव जाहीर केले जाणे बाकी आहे. या अपघाताच्या साक्षीदारांना पोलिसांनी मदतीचे आवाहन केले आहे.
हा अपघात दिनांक १९ मार्च रोजी संघ्याकाळी लंडनमधील क्लर्केनवेल रस्त्यावर घडला. कोचर या रस्त्यावर गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत सापडल्या होत्या. उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचे घटनास्थळीच निधन झाले होते.
या अपघातप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. लंडन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. निती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी कोचर यांच्या अपघाती मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे.