बंगलुरू – कर्नाटकात शिक्षणाचे भगवेकरण सुरू असल्याचा आरोप करीत कॉंग्रेस विद्यार्थी संघटनेच्या निदर्शकांनी शिक्षण मंत्री बी.सी. नागेश यांच्या निवासस्थाना बाहेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्वीचा वेष असलेल्या खाकी चड्डया जाळून आपला निषेध नोंदवला त्यावरून भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे.
जनतेने कॉंग्रेसवाल्यांच्या चड्डया या आधीच उतरवल्याने त्यांना अशी कृत्ये करण्याची वेळ आली आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे. तर कॉंग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी संघावर या प्रकरणात टीका करताना आत्तापर्यंत सरसंघचालक पदावर एकही दलित किंवा ओबीसी नेत्यांना संधी का मिळू शकली नाही, असा सवाल करीत हे लोक केवळ चड्ड्यांचेच राजकारण करीत राहिले आहेत, असा आरोप केला.
शालेय शिक्षणात भगवेकरण केले जात असल्याच्या आरोपातून हा सारा प्रकार तेथे सुरू झाला. कर्नाटकातील भाजप सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात एनएसयुआय या कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर संघाच्या काहीं खाकी चड्डया जाळून आपला निषेध नोंदवला.
दरम्यान कॉंग्रेसच्या या कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संघाच्या मंड्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी चड्ड्या गोळा करून त्या कॉंग्रेस कार्यालयाला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यावर पत्रकारांनी सिद्धरामैय्या यांना प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले की, हे चड्डीवाले चड्ड्या गोळा करण्याशिवाय दुसरे काहीही करू शकत नाहीत. आम्ही संघांच्या चड्ड्या जाळून शिक्षणाच्या भगवेकरणाचा प्रयत्न हाणून पाडणार आहोत अशी घोषणा त्यांनी काल केली होती.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री बोम्माई यांनीही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे की, कॉंग्रेस नेत्यांकडे आता बोलण्यासारखो कोणताही विषय राहिलेला नाही. त्यामुळे ते या विषयावर बोलत आहेत. सिद्धरामैय्या यांनी अशा विषयावर बोलण्यापेक्षा राज्याच्या विकासावर बोलले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.